महाराष्ट्रात राहता तर मराठी भाषा शिका- भगत सिंह कोश्यारी

वाशी येथे उभारण्यात आलेल्या 'उत्तराखंड भवन'चे लोकार्पण राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते

Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रात राहणा-या प्रत्येकाला मराठी भाषा आलीच पाहिजे असा आग्रह अनेक राजकीय नेत्यांचा असतो किंबहुना महाराष्ट्रात राहणा-या कित्येक मराठी माणसांचाही तसा आग्रह असतो. मात्र आता महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी देखील असेच काहीसे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रात राहता तर मराठी भाषा शिका,' असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी नवी मुंबईत केले. वाशी येथे उभारण्यात आलेल्या 'उत्तराखंड भवन'चे लोकार्पण राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते

महाराष्ट्र आणि उत्तराखंड या दोन राज्यांमध्ये सांस्कृतिक आदानप्रदान व एकतेची भावना आहे. मराठी आणि उत्तराखंडातील पहाडी भाषा या दोन भाषांमध्ये बरेचसे साधर्म्य आहे. मराठी बोलणे फारसे अवघड नाही. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा बोलता येणे आवश्यक आहे, असे भगत सिंह कोश्यारी यांनी यावेळी सांगितले. भगत सिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरुन हटवण्याची शक्यता; प्रसारमाध्यमांनी दिले वृत्त

उत्तराखंड राज्याप्रमाणे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव वाढविण्यासाठी राज्य सरकारशी चर्चा करणार असल्याचे सांगून कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील देश प्रगती करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. मात्र येथे वास्तव्य करताना आपल्या मूळ राज्याला, प्रांताला विसरू नका, आपल्या गावाचा विकास करण्यासाठी मूळ गावांना अवश्य भेटी द्या, असे आवाहन कोश्यारी यांनी केले.

यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत, उत्तराखंड राज्याच्या आदिवासी मंत्री रेखा त्यागी, महापौर जयवंत सुतार, आमदार गणेश नाईक, म्हात्रे आदींसह उत्तराखंड राज्याचे मूळ रहिवासी असलेले परंतु मुंबईमध्ये कार्यरत असलेले अधिकारी, चित्रपट कलावंत यांसह नागरिक उपस्थित होते.