ICICI Bank Robbery: विरार येथे आयसीआयसीआय बँकेवर दरोडा, महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू; माजी कर्मचाऱ्यास अटक
या दरोड्यात दोन महिला कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यातील एका महिला कर्मचाऱ्याचा उपचारादम्यान मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे हा दरोडा टाकण्यात बँक शाखेच्या माजी कर्मचाऱ्याचा हात असल्याचेही पुढे आले आहे.
आयसीआयसीआय बँकेच्या (ICICI Bank Virar) विरार येथील शाखेवर सशस्त्र दरोडा (Robbery) दरोडा पडला आहे. या दरोड्यात दोन महिला कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यातील एका महिला कर्मचाऱ्याचा उपचारादम्यान मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे हा दरोडा टाकण्यात बँक शाखेच्या माजी कर्मचाऱ्याचा हात असल्याचेही पुढे आले आहे. प्राप्त माहितीनुसार हा दरोड्याची (ICICI Bank Robbery at Virar) ही घनाट गुरुवारी (29 जुलै 2021) रात्री साधारण 8 वाजण्याच्या सुमारास घडली. दरोडेखोर बँकेतील रोख रक्कम आणि पैसे घेऊन पसार होण्याच्या प्रयत्नात होते. परंतू, बँकेतील आरडाओरडा आणि गोंधळ लक्षात आल्याने स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका दरोडेखोराला नागरिकांनी घटनास्थळी पकडले.
घटनेबोबत प्राथमिक माहिती अशी की, बँकेच्या माजी कर्मचाऱ्यांनेच दरोड्याचा हा कट रचला होता. हा कर्मचारी बँकेचा माजी व्यवस्थापक अनिल दुबे असल्याचे समजते. गुरुवारी रात्री बँक बंद झाल्यानंतर बहुतांश कर्मचारी निघून गेले. बँकेत केवळ रोखपाल श्वेता देवरूख (वय ३२) आणि व्यवस्थापक योगिता वर्तक (वय ३४) या दोघीच थांबल्या होत्या. दरम्यान, रात्री आठ वाजण्याच्या सुमारास माजी व्यवस्थापक असलेला अनिल दुबे शाखा कार्यालयात आला. त्याने दोघींवर चाकूचा धाक दाखवत हल्ला केला. तो इतक्यावरच थांबला नाही. तर त्याने बँकेतील रोख रक्कम आणि सोने लुटण्याचा प्रयत्न केला. या वेळी दोघिंनी विरोध केला असता त्याने दोघींवर चाकुने हल्ला केला.
दरम्यान, अनिल दुबे याने केलेल्या हल्लयात व्यवस्थापक योगिता वर्तक आणि रोखपाल श्वेता गंभीर जखमी झाल्या. विरार पोलिसांना घटनेची माहिती कळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी असलेल्या दोघींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी व्यवस्थापक योगिता वर्तक यांना मृत घोषीत केले. दरम्यान, कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्यानंतर आरोपी अनिल दुबे हा बँकेतील रोख रक्कम आणि सोने घेऊन फरार होण्याच्या प्रयत्नात होता. तोपर्यंत झालेल्या गोंधळावरुन नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दरोडेखोर अनिल दुबे यास पकडले. सध्या दुबे हा पोलिसांच्या ताब्यात आहे. विरार पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.