IPL Auction 2025 Live

नागपूर: रेल्वे डब्यावर चढून ओव्हरहेड वायर हातात पकडली, बायकोच्या डोळ्यादेखत नवऱ्याचा मृत्यू, सीसीटीव्हीत कैद झाला थरार

कामाच्या शोधात ते महाराष्ट्रात आले. दहा दिवसांपूर्वीच घर सोडलेले ते दोघे नागपूर येथे पोहोचले होते. हाताला काम नाही आणि जवळचे पैसे तर संपले अशा अवस्थेत दोघे भटकत होते.

Indian Railways (Photo Credits: PTI)

रेल्वे (Railway ) डब्यावर चढून ओव्हरहेड वायर हातात पकडण्याचा प्रयत्न एका जोडप्याने नागपूर रेल्वे स्थानक (Nagpur Railway Station) येथे केला. या जोडप्याची कृती स्टेशनवर कर्तव्यास असलेल्या सुरक्षारक्षांच्या ध्यानात आली. त्यांनी या जोडप्याला डब्यावरुन खाली घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षारक्षकांना या कामात पूर्ण यश आले नाही. या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर, त्याच्यासोबत असलेल्या तरुणीला वाचवण्यात पोलीसांना यश आले. हे जोडपं पती-पत्नी असून त्यांनी काही महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह केल्याचे समजते. बिरबल कथ्थू पहरिया (२५) असे पतीचे तर ज्ञानदेवी (१९) असे पत्नीचे नाव आहे

प्राप्त माहितीनुसार, बिरबल कथ्यू पहरिया आणि ज्ञानदेवी हे मूळचे ओडिशा राज्यातील हरिवासी आहेत. कामाच्या शोधात ते महाराष्ट्रात आले. दहा दिवसांपूर्वीच घर सोडलेले ते दोघे नागपूर येथे पोहोचले होते. हाताला काम नाही आणि जवळचे पैसे तर संपले अशा अवस्थेत दोघे भटकत होते. दरम्यान, आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नागपूर रेल्वे स्थानक फलाट क्रमांक एकवर गाडी उभी होती. या वेळी हे दाम्पत्य एफओबीवरून गाडीच्या छतावर उतरण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना कर्तव्यावर असलेल्या फलाटावरील सुरक्षारक्षकांनी हटकले. तसेच, फलाटावरील प्रवाशांनीही आरडाओरडा केला. आरडाओरडा पाहून काहीतरी अघटीत प्रसंग घडल्याचे जाणवल्याने ओएचईचा वीज पुरवठा त्वरीत खंडित करण्यात आला. परंतू, ओएचईचा वीज पुरवठा खंडित झाला तरी, त्यात काही काळ वाज कायम राहते. याच ओव्हरहेड वायरला बरबल याने हाताने स्पर्ष केला. ज्यामुळे विजेचा धक्का लागून तो तारेला चिकटला.

दरम्यान, बिरबल याला लाकडी काठीचा आधार घेत डकलून तारेपासून दूर करण्यात आले. मात्र, विजेचा धक्का बसलेला बिरबल डोक्यावर पडला. डोक्यावर पडल्याने मार वर्मी लागला आणि त्याचा मृत्यू झाला. पत्नी ज्ञानदेवी हिच्या डोळ्यासमोर बिरबल याचा मृत्यू झाला. ज्ञानदेवी हिसुद्धा असेच काही करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, उपस्थितांनी तिला रोखले.