Sanjay Raut on Devendra Fadnavis: कोरोनाची परिस्थिती किती गंभीर आहे? हे देवेंद्र फडणवीस यांना आता समजले असेल; शिवसेना खासदार संजय राऊत यांचे विधान

फडणवीसांनी आपण दिलेला शब्दानुसार सरकारी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना कोरोनाची लागण झाली असून सरकारी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. फडणवीसांनी आपण दिलेला शब्दानुसार सरकारी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नसल्याचा आरोप विरोधीपक्षातील अनेक नेते करत होते. याच मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. तसेच कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती किती गंभीर आहे? हे देवेंद्र फडणवीसांना आता समजले असेल, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस हे गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात दौरा करत होते. त्याचबरोबर बिहार विधानसभा निवडणुकीची जबाबदारीही भाजपने त्यांच्यावर सोपवलेली असल्याने बिहारमध्येही ते सातत्याने फिरतीवर होते. मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांनी कोरोनाची चाचणी करवून घेतली होती. शनिवारी या चाचणीचा अहवाल आला ज्यात फडणवीसांना कोरोनाची लागण निष्पन्न झाले आहे. यावर संजय राऊत म्हणाले की, आम्ही देवेंद्र फडणवीसांना सातत्याने त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यायला सांगत होतो. आता त्यांना समजले असेल की कोरोनामुळे बाहेर निर्माण झालेली परिस्थिती किती गंभीर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सर्वोत्तम उपचार होतील यासाठी डॉक्टरांना सूचना दिल्या आहेत, असेही संजय राऊत म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Gopinath Gad Dasara Melava 2020: माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न केला गेला, पण मला चक्रव्यूहत जायचे आणि बाहेर यायचेही माहित आहे; पंकजा मुंडे

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी! अशा आशयाचे ट्वीट देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले आहे.