Anil Deshmukh on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्या होम क्वारंटाईनबाबत विचारलेल्या प्रश्नावर गृहमंत्र्यांनी दिले 'हे' उत्तर

यावर उत्तर देत 'आपण 15 ते 27 फेब्रुवारीपर्यंत होम क्वारंटाईन होतो' असे अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.

Anil Deshmukh and Devendra Fadnavis (Photo Credits: PTI and ANI)

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर विरोधकांनी हे प्रकरण उचलून धरलय. विरोधकांकडून अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र परमबीर सिंह यांच्या आरोपात काही तथ्य नसून अनिल देशमुख 15 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारीपर्यंत होम क्वारंटाईन होते असे शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 15 फेब्रुवारी रोजी देशमुख यांच्या पत्रकार परिषदेचं ट्विट रिट्विट करत सवाल पवारांना सवाल केला आहे. यावर उत्तर देत 'आपण 15 ते 27 फेब्रुवारीपर्यंत होम क्वारंटाईन होतो' असे अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.

"मला 15 फेब्रुवारीला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मी रुग्णालयातून बाहेर पडलो. तेव्हा काही पत्रकार मला भेटण्यासाठी थांबले होते. त्यावेळी मला थोडं अशक्त झाल्यासारखे वाटत होते. तरीही मी एका खुर्चीवर बसून पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर दिली आणि ताबडतोब तेथून निघून आपल्या कारमधून घरी गेलो. त्यानंतर मी 27 फेब्रुवारीपर्यंत होम क्वारंटाईन होतो. मी 28 फेब्रुवारीला पहिल्यांदा घराबाहेर पाऊल ठेवले" असे स्पष्टीकरण गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे.हेदेखील वाचा- Parambir Singh Letter Bomb: माजी मुंबई पोलिस आयुक्तांनी अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांत तथ्य नाही शरद पवार यांचा बचाव तर BJP कडून 'होम क्वारंटाईन' मध्ये पत्रकार परिषद कशी? चा सवाल

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

"15 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात. पण, 15 फेब्रुवारीला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यम प्रतिनिधी अशी पत्रकार परिषद मात्र झाली होती. हे नेमके कोण?,” असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला होता.

काय म्हणाले होते शरद पवार?

"परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाला ठोस आधार नसल्याचं सांगत पवारांनी देशमुखांची पाठराखण केली. परमबीर सिंग यांनी दिलेल्या तारखांच्या कालावधीत देशमुख हे क्वारंटाईन होते," असं राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार म्हणाले.