मुंबई, कोल्हापूरसह राज्यात हाय अलर्ट; मुख्यमंत्र्यांनी घेतला सुरक्षेचा आढावा

या बैठकीत राज्याचे पोलिस महासंचालक, मुंबईच्या पोलिस आयुक्तांसह वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Photo Credits PTI)

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर बदला घेण्यासाठी भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मिरवर हल्ला करून दहशतवादी संघटनेचे तळ उध्वस्त केले. यावर पाकिस्तानकडूनही प्रत्युत्तर यायला सुरुवात झाली आहे, चिडलेल्या पाकिस्तानने सीमेवर चकमकी सुरु केल्या. आज जगातील सर्व राष्ट्रांनी पाकिस्तानला समर्थन देणे बंद केले असले तरी पाकिस्तानचा दहशतवाद्यांना थारा ही चिंतेची बाब आहे. या पार्श्वभूमीवर  मुंबईत देखील हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी विधानभवनात एक बैठक बोलावली होती. या बैठकीत राज्याचे पोलिस महासंचालक, मुंबईच्या पोलिस आयुक्तांसह वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते, सर्वांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, तसेच याआधी झालेल्या हल्ल्यामुळे आता मुंबईमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशन रद्द करण्याबद्दलही विचार चालला असल्याचे सूत्रांकडून समजत आहे. अधिवेशन काळात सर्व महत्वाचे लोक एकत्र जमतात अशावेळी सुरक्षा यंत्रणेवर अधिक ताण येतो. तणावाच्या पार्श्वभूमीवर हा पोलिस बंदोबस्त इतरत्र वापरता यावा यासाठी अधिवेशन रद्द करण्याचा विचार सुरु आहे. (हेही वाचा: मुंबई, पंजाब, गुजरात सीमेवर भारतीय वायुसेनेकडून हाय अलर्ट जाहीर)

सध्याची तणावाची परिस्थिती पाहता कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिरातील सुरक्षा देखील वाढविण्यात आली आहे. बाॅम्बशोधक पथक, शीघ्र कृती दल आणि जुना राजवाड पोलिस यांनी अंबाबाई मंदिराची व परिसराची कसून तपासणी केली.