पुण्यात हेल्मेटसक्ती जोरात; 'नो हेल्मेट’चा दंड तब्बल 18,500, 37 वेळा विनाहेल्मेट
हा वाहनचालक सुमारे 37 वेळा विनाहेल्मेट असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आढळून आला आहे
1 जानेवारीपासून पुण्यात हेल्मेटसक्ती सुरु झाली. मात्र पुणेकरांनी ही गोष्ट तितकीशी मनावर घेतली नाही, त्यानंतर पोलिसांनी जेव्हा कारवाया करण्यास सुरुवात केली तेव्ह कुठे पुणेकर पगडी ऐवजी हेल्मेट वापरताना दिसून आले. आता तर वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी सीसीटीव्हीचा वापर होताना दिसून येत आहे. यामुळेच ट्राफिक पोलिसांनी एका वाहनचालकाला हेल्मेट न वापरल्यामुळे तब्बल 18 हजार 500 रुपयांचा दंड आकारला आहे. हा वाहनचालक सुमारे 37 वेळा विनाहेल्मेट असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आढळून आला आहे.
पोलिसांनी केलेली हेल्मेटसक्ती ही नागरिकांची सुरक्षा आणि कायदेशीरदृष्ट्या योग्य होती, असे काही लोक सांगतात. पण, आमच्या सुरक्षेची काळजी घेण्यास आम्ही समर्थ आहोत. त्यासाठी पोलिसांनी जबरदस्ती करु नये असे सांगत पुणेकरांनी या सक्तिला विरोधही केला होता. मात्र जेव्हा कारवाई होण्यास सुरुवात झाली तेव्हा कुठे पुणेकर वठणीवर आले. या हेल्मेटसक्तीमुळे लाखो रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल केला आहे. त्यात आता सीसीटीव्ही पोलिसांची मदत करताना दिसत आहेत. (हेही वाचा: हेल्मेट सापडत नाही, महिलेने डोक्याला घातला कुकर; छायाचित्र व्हायरल)
पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहनचालकांवर लक्ष ठेवत आहेत. वाहतूक पोलिसांनी ‘टॉप 100′ वाहनचालकांची यादी तयार केली आहे. यानुसार अशा सर्व वाहनचालकांच्या घरी नोटीस पाठवण्यात येणार आहे. यामध्ये एका वाहनचालकाला तब्बल 18 हजार 500 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तर अशा शंभर लोकांमध्ये शेवटी असणाऱ्या काही लोकांना 5 हजार दंड आकारला गेला आहे.