Hasan Mushrif Car Vandalize: मुंबई मध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड, 3 जण ताब्यात
अनेक ठिकाणी मंत्री, आमदारांच्या गाड्यांना हेरून त्यावर हल्ला केला जात आहे.
आज (1 नोव्हेंबर) सकाळी 7-7.30 च्या सुमारास ही गाडी फोडल्याची घटना घडली आहे. हसन मुश्रीफांच्या (Hasan Mushrif) गाडीवर हल्ला करणार्यांमध्ये मराठा आंदोलकांचा हात असल्याचं मीडीया रिपोर्ट्सवरून समोर आले आहे. गाडीचे नुकसान झाले असून काचाही फोडण्यात आल्या आहेत. चौकशीनंतर ही गाडी हसन मुश्रीफांची असल्याचं समोर आलं आहे. काही मराठा आंदोलकांनी मंत्री मुश्रीफ यांची गाडी हेरुन गाडीवर हल्ला केला. ज्यावेळी हल्ला झाला, त्यावेळी तिथे पोलीस उपस्थित होते. पोलिसांनी तात्काळ आक्रमक मराठा आंदोलकांना ताब्यात घेतलं. त्यामुळे आता मराठा आरक्षणाचं हे आक्रमक रूप ग्रामीण भागापाठोपाठ पुणे, मुंबई सारख्या शहराच्या भागातही पोहचल्याचं दिसून येत आहे.
महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. अनेक ठिकाणी मंत्री, आमदारांच्या गाड्यांना हेरून त्यावर हल्ला केला जात आहे. यापूर्वी प्रकाश सोळंके आणि संदीप क्षीरसागर यांच्या घरावरही दगडफेक करत गाड्यांचेही नुकसान करण्यात आले आहे. मुख्यमंत्री, उपमंत्र्यांसोबतच मनोज जरांगेंनीही शांततेमध्ये मराठा आरक्षण आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. Maratha Aarakshan: मराठा आरक्षण प्रश्नी हेमंत गोडसे ते रमेश बोरनारे पहा कोणकोणत्या आमदार, खासदारांनी दिला राजीनामा!
हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया
गाडीच्या तोडफोड प्रकरणी हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 'मी सुरक्षित आहे. ज्यांनी माझ्या गाडीची तोडफोड केली, त्या तरुणांना सोडून द्यावं. त्यांना कोणतीही शिक्षा करू नये, अशी माझी विनंती आहे. मराठा समाज हा आमचाच समाज आहे. आरक्षण मिळेपर्यंत आम्ही मराठा समाजाच्या पाठीशी राहणार आहोत. मंत्र्यांची घरं जाळणं हे अत्यंत गंभीर आहे. यामुळे आंदोलनाला गालबोट लागत आहे.' असं ते म्हणाले आहेत.
गृहमंत्र्यांचे निर्देश
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच मीडीयाशी बोलताना शांततेने आंदोलन करण्याचा सार्यांना अधिकार आहे. त्यामध्ये सरकार आठकाठी करणार नाही. परंतू कोणत्याही प्रकारच्या हिंसेंचं समर्थन केले जाऊ शकत नाही. त्यामुळे जाळपोळ, गाड्या फोडणं अशा प्रकारांमध्ये दोषी आढळणार्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी दिले आहेत. यावेळी बोलताना सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याची प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे. आज या प्रश्नी सर्व पक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे.