Guinness World Record: महाराष्ट्रात NHAI चा विश्वविक्रम; अकोला-अमरावती दरम्यान 105 तासांत बांधला 75 किमीचा रस्ता (See Photo)
3 जून रोजी सकाळी 7.27 वाजता ते बनविण्याचे काम सुरू करण्यात आले व 7 जून रोजी सायंकाळी 5 वाजता ही लेन पूर्ण झाली.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) मंगळवारी नवा विक्रम प्रस्थापित केला. प्राधिकरणाने NH-53 महामार्गावर एका लेनमध्ये पाच दिवसांपेक्षा कमी कालावधीत 75 किलोमीटर अखंड रस्ता म्हणजेच बिटुमिनस लेन (Bituminous Lane) तयार करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. महाराष्ट्रातील अमरावती ते अकोला (Akola-Amaravati) या मार्गावर 105 तास 33 मिनिटांच्या वेळेत हा विक्रम पूर्ण करण्यात आला. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. त्यांनी महामार्गाचे छायाचित्र व गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्रही पोस्ट केले आहे.
व्हिडिओ संदेश जारी करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवर लिहिले की, ‘संपूर्ण देशासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. आमच्या NHAI टीमचे अभिनंदन करताना मला खूप आनंद होत आहे.’ मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 720 मजूर आणि स्वतंत्र सल्लागारांच्या चमूने अहोरात्र काम केले. या लेनसाठी 36,634 मेट्रिक टन मिश्रण वापरले गेले, ज्यामध्ये 2,070 मेट्रिक टन बिटुमन होते.
गडकरी म्हणाले की, 75 किमीच्या सिंगल-लेन बिटुमिनस काँक्रीट रस्त्याची एकूण लांबी 37.5 किमीच्या दोन-लेन पक्क्या रस्त्याच्या बरोबरीची आहे. 3 जून रोजी सकाळी 7.27 वाजता ते बनविण्याचे काम सुरू करण्यात आले व 7 जून रोजी सायंकाळी 5 वाजता ही लेन पूर्ण झाली. परिवहन मंत्री पुढे म्हणाले की, सर्वात लांब अखंड बिटुमिनस बांधकामाचा मागील गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड 25.275 किमी रस्ता बांधकामाचा होता, जो फेब्रुवारी 2019 मध्ये दोहा, कतार येथे करण्यात आला. ते काम 10 दिवसांत पूर्ण झाले होते. (हेही वाचा: रेपो दरांमध्ये 50 बेसीस पॉईंटची वाढ, कर्जाचे हप्ते महागणार; पाहा काय म्हणाले गव्हर्नर शक्तिकांत दास)
अमरावती ते अकोला विभाग हा राष्ट्रीय महामार्ग (NH) 53 चा भाग आहे. कोलकाता, रायपूर, नागपूर आणि सुरत या प्रमुख शहरांना जोडणारा हा एक महत्त्वाचा कॉरिडॉर आहे. NH-53 महामार्ग भारतातील खनिज समृद्ध प्रदेशातून जातो. हे काम राजपूत इन्फ्राकॉन या खासगी कंत्राटदाराने पूर्ण केले आहे. याआधीही राजपूत इन्फ्राकॉनने सांगली ते सातारा दरम्यान 24 तासांत रस्ता तयार करून विश्वविक्रम केला होता.