Lockdown in Mumbai: मुंबईत पुन्हा लॉकडाऊन? पहा, काय म्हणाले पालकमंत्री अस्लम शेख

दरम्यान, मुंबईतही लॉकडाऊन होणार का? असा प्रश्न मुंबईकरांच्या मनात आहे. यावर बोलताना मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे.

Lockdown | Representational Image | (Photo Credits: IANS)

राज्यात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन (Lockdown), नाईट कर्फ्यू (Night Curfew) यांसारखे कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. दरम्यान, मुंबईतही लॉकडाऊन होणार का? असा प्रश्न मुंबईकरांच्या मनात आहे. यावर बोलताना मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Guardian Minister Aslam Sheikh) यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. रुग्णसंख्येत वाढ झाल्यास लॉकडाऊन होऊ शकतो, असे शेख म्हणाले. तसंच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोविड-19 च्या वाढत्या संसर्गामुळे लोकलसेवा पुन्हा बंद होईल, अशी चिंता नागरिकांना आहे. यावर बोलताना शेख म्हणाले की, लोकल बंद होण्याची परस्थिती उद्भवू नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला आहे. आवाहन करुन लोक ऐकत नसतील तर कारवाई होणारच. हॉटेल, नाईट क्लबवर कारवाई सुरु आहे. लॉकडाऊन टाळण्यासाठीच हा प्रयत्न आहे. तसंच लॉकडाऊन नको असेल तर मुंबईकरांनी जबाबदारीने वागले पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी केली. रुग्णसंख्येतील वाढ कमी झाली नाही तर काय आणि कोणते बदल करावे लागतील यावर मुख्यमंत्र्यासोबत बैठक होणार असल्याचेही अस्लम शेख यांनी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन बाबत 8 दिवसांचे अल्टिमेटम दिले आहे. 8 दिवसांत परिस्थितीची पाहणी करुन लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. 'मास्क वापरा, लॉकडाऊन टाळा,' हा सोपा पर्याय त्यांनी नागरिकांना दिला आहे. तसंच कोरोना संबंधित इतर नियमांचे पालन करणेही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील 'कृपा करा, कठोर निर्णय घेण्याची वेळ राज्य सरकारवर येऊ देऊ नका,' असा इशारा जनतेला दिला आहे.