Online Final Year Exams In Maharashtra: अंतिम वर्षाची संपूर्ण परीक्षा प्रक्रिया 31 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करा; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना सूचना

उदय सामंत यांनी म्हटले आहे की, राज्यातील विद्यापीठांतील अतिम वर्षांच्या लेखी परीक्षा या ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पार पडतील.

Governor Bhagat Singh Koshyari and Higher and Technical Education Minister Uday Samant (Photo Credits: Twitter)

Maharashtra Final Year Exam Online: राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंना सूचना केल्या आहेत की, अंतिम वर्षाची संपूर्ण परीक्षा (University Final Year Exams In Maharashtra) प्रक्रिया येत्या 31 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करण्यात यावी. तसेच प्रात्यक्षिक परीक्षाही येत्या 15 सप्टेंबर पासून सुरु करण्यात याव्यात. राज्यपालांनी कुलगुरुंना केलेल्या सूचनांबाबत राजभवनाकाडून अधिकृतरीत्या कळविण्यात आले आहे. तसेच, राज्यपालांच्या ट्विटर हँडलवरुनही याबाबत माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनीही विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत माहिती दिली आहे. उदय सामंत यांनी म्हटले आहे की, राज्यातील विद्यापीठांतील अतिम वर्षांच्या लेखी परीक्षा या ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पार पडतील. या परीक्षांचा निकाल 31 ऑक्टोबरपर्यंत लावणयाचा प्रयत्न केला जाईल, असेही सामंत यांनी म्हटले आहे. (हेही वाचा,University Final Year Exams In Maharashtra: विद्यापीठ अंतिम वर्ष परिक्षा कधी होणार? मंत्री उदय सामंत यांनी दिली महत्त्वाची माहती )

राज्यपाल आणि राज्यातील विद्यापीठांचे कुलगुरु यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीनंतर उदय सामंत हे पत्रकारांशी बोलत होते. या वेळी बोलताना सामंत यांनी सांगितले की, परीक्षा घेण्याबाबतचा अंतिम अहवाल उद्या (4 सप्टेंबर) पर्यंत सादर केला जाईल. त्यानंतर पुढील विचार केला जाईल, असे सामंत म्हणाले. विद्यार्थ्यांनी घरी बसून परीक्षा द्यावी असा आमचा विचार होता. त्यासाठी ऑनलाइन, ऑफलाइन असे पर्याय आहेत. त्यावर आज रात्रीपर्यंत अहवाल तयार होईल. हा अहवाल शासनाला मिळाल्यानंतर तो तातडीने कुलगुरुंना पाठवला जाईल असेही उदय सामंत यांनी या वेळी सांगितले.