शेतकरी बांधवांना दिवसा आणि पुरेशी वीज देणे शासनाची प्राथमिकता; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिला विश्वास
वीजबिल थकलेल्या सर्व शेतकऱ्यांनी थकित वीजबिलांवर सूट मिळवण्यासाठी नवीन कृषी वीज जोडणी धोरणाअंतर्गत जाहीर केलेल्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी केले
नुकतेच अर्थमंत्री अजित पवार यांनी 'वीज कनेक्शन तोडण्याची जी काही प्रक्रिया सुरू आहे, ती थांबवण्यात येणार आहे. वीज बिलाच्या मुद्यावर सभागृहात चर्चा होणार आहे. ऊर्जा विभागाकडून याची सविस्तर माहिती दिली जाईल, तोपर्यंत वीज कनेक्शन तोडण्याचे काम थांबवण्यात येत आहे', अशी घोषणा केली. आता शेतकरी बांधवांना दिवसा आणि पुरेशी वीज देणे शासनाची प्राथमिकता असून महाकृषी ऊर्जा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत कृषी ऊर्जा पर्वाचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते विधानभवनात करण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, जगाचे कामाचे तास सूर्यप्रकाशात असतात आणि शेतकऱ्यांचे मात्र रात्रीचे कशासाठी. ऊन, वारा, पाऊस अशा सर्व संकटांचा मुकाबला करत तो जगासाठी सोनं पिकवत असतो. त्याच्या आयुष्यात सुखा- समाधानाचे क्षण कसे येतील हे पाहणे सरकारचे काम आहे. ‘घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ’ असे आम्ही होऊ देणार नाही. शेतकऱ्यांच्या आशीर्वादाची ताकद मोठी असते. ती जेवढी जास्त मिळेल तेवढा काम करण्याचा हुरुप वाढतो. त्या जोरावर आम्ही शेतकऱ्यांसाठी जे जे करणे शक्य आहे ते निश्चितच करू.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, वीजग्राहकांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण करण्यासाठी शासनाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. वीजबिल थकलेल्या सर्व शेतकऱ्यांनी थकित वीजबिलांवर सूट मिळवण्यासाठी नवीन कृषी वीज जोडणी धोरणाअंतर्गत जाहीर केलेल्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी केले. तसेच शेतकरी, घरगुती वीज ग्राहक आदी सर्वांनाच व्यवस्थित वीज मिळाली पाहिजे यासाठी सर्वांनी वीजबिले भरणे आवश्यक आहे. वीजगळती होणार नाही याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे, असेही पवार म्हणाले.
कृषी ऊर्जा पर्व अंतर्गत 1 मार्चपासून 14 एप्रिलपर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यात महाकृषी अभियानाची माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल यासाठी व्यापक प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे.