शरद पवार यांना कोरोना म्हणणाऱ्या गोपीचंद पडळकर यांना भाजपचे बक्षीस, पक्ष प्रवक्ते म्हणून झळकणार

यात खासदार भारती पवार, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार राम कदम यांच्यासह 10 प्रवक्त्यांचा समावेश आहे. भाजपच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या.

Gopichand Padalkar | (Photo Credits: Facebook)

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा उल्लेख महाराष्ट्राचा कोरोना व्हायरस असा करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांची भाजप प्रवक्ते म्हणून निवड झाली आहे. पडळकर यांची प्रवक्ता म्हणून निवड झाल्यानंतर भाजपने त्यांना एक प्रकारे बक्षीसच दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भारतीय जनता पक्षाने आगामी काळासाठी प्रवक्ते व पॅनेलिस्ट यांची नियुक्ती जाहीर केली आहे. यात खासदार भारती पवार, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार राम कदम यांच्यासह 10 प्रवक्त्यांचा समावेश आहे. भाजपच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या.

गोपीचंद पडळकर यांच्यासारख्या अत्यंत नवख्या आमदाराला भाजपनेृ प्रवक्ता म्हणून जबाबदारी दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गोपीचंद पडळकर गेली अनेक वर्षे भाजप सोबत काम करत आहेत, असे भाजप नेते नेहमीच सांगत असतात. परंतू, लोकसभा निवडणूक 2019 मध्ये त्यांनी भाजप उमेदवाराविरोधात निवडणूक लढवली होती. भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या पक्षाला मते देऊ नका अशा आशयाचे विधान करत पडळकर यांनी नागरिकांना बिरोबाची शपथही घातली होती. असे असताना भाजपने त्यांना ज्येष्ठांना डावलत विधानपरिषदेवर उमेदवारी दिली. आता त्यांना पक्षाने प्रवक्ते पद दिले आहे. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. (हेही वाचा, गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात माणिकपूर पोलीस ठाणे दप्तरी गुन्हा दाखल, शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याचे प्रकरण)

भाजपने घोषीत केलेली प्रवक्त्यांची यादी

प्रवक्ता

दरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर विविध क्षेत्रांतून संतप्त पडसाद उमटले होते. त्यानंतर पडळर यांचे विधान व्यक्तिगत असल्याचे भाजपला सांगावे लागले होते. त्यामुळे अशा पडळकर यांना भाजने एक प्रकारे बक्षीस दिले की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.