एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! दिवाळीपूर्वी मिळणार थकित वेतन; राज्य शासनाकडून 1 हजार कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर

मागील 3 महिन्यांचे थकलेले वेतन दिवाळीपूर्वी देण्यात येणार असून एसटीसाठी एक हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी केली आहे.

Anil Parab | (File Photo)

एसटी कर्मचाऱ्यांनासाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. मागील 3 महिन्यांचे थकलेले वेतन दिवाळीपूर्वी देण्यात येणार असून एसटीसाठी एक हजार कोटी रुपयांचं आर्थिक पॅकेज जाहीर केल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब (State Transport Minister Anil Parab) यांनी दिली आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची ठरणार असल्याची चिन्हं दिसू लागली आहेत. (महाराष्ट्र: वेतन थकल्यामुळे रत्नागिरी आणि जळगाव मध्ये एसटी कर्मचा-याची आत्महत्या)

पत्रकार परिषेदत बोलताना अनिल परब म्हणाले की, "एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गेले काही दिवस अत्यंत गंभीर होता. वेतन कर्मचाऱ्यांना मिळालंच पाहिजे अशी परिवहन मंडळाचा अध्यक्ष म्हणून माझी आग्रही मागणी होती. तसंच दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना त्यांचं वेतन मिळेल, असे मी त्यांना वारंवार आश्वस्त केलं होतं. परंतु, महामंडळाची एकूण आर्थिक परिस्थिती पाहता पैशांची जमवाजमव करणं खूप कठीण होतं. मात्र तरी देखील अनेक प्रयत्नांनी कर्मचाऱ्यांचं एक महिन्याचं थकीत वेतन आणि बोनस कालच देण्यात आला आहे. तसंच दिवाळीपूर्वी अजून एका महिन्यांचं थकित वेतन देण्यात येईल, अशी मी कबुली दिली होती. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यात आता उरलेल्या 2 महिन्याचं वेतन दिवाळीपूर्वी देण्यात येईल."

MAHARASHTRA DGIPR Tweet:

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न वारंवार निर्माण होतो. त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सहा महिन्यांसाठी आर्थिक पॅकेज द्यावं, अशी मागणी मी केली होती. त्यानंतर एसटी महामंडळासाठी एक हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आलं, असंही त्यांनी सांगितलं. यामुळे एसटी महामंडळाची गाडी व्यवस्थित मार्गावर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, आत्महत्या झाली म्हणून पगार देण्यात आल्याचे काही प्रसारमाध्यमांनी म्हटले होते. परंतु, त्यामुळे नाही तर मी स्वत: एसटी कर्मचाऱ्यांचे पगार मिळावेत म्हणून प्रयत्नशील होतो. तसंच हे शासन तुमच्या पाठीशी असल्याचा विश्वास देत कोणतेही टोकाचे पाऊल न उचलण्याचे आवाहन अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे.