PM Kisan Samman Nidhi: शेतकऱ्यांसाठी खूशखबर! महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांची आर्थिक मदत 15,000 रुपयांपर्यंत वाढवणार; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी पुण्यात घोषणा केली आहे.

PM Kisan Samman Nidhi, Devendra Fadnavis (फोटो सौजन्य - Twitter, ANI)

PM Kisan Samman Nidhi: शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात येणारी 12 हजार रुपयांची आर्थिक मदत लवकरच 15 हजार रुपये करण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी पुण्यात घोषणा केली आहे. कृषी महाविद्यालयात शेतकरी सन्मान दिनाच्या कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत, ज्यात आर्थिक पाठबळ देण्यासाठी पीएम किसान योजना आणि पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना देण्यात येणारी आर्थिक मदत वाढणार -

पीएम किसान योजनेंतर्गत, शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये मिळतात आणि नमो शेतकरी योजना आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेद्वारे राज्य सरकारकडून 6,000 रुपयांची रक्कम दिली जाते. राज्य सरकार आता दोन्ही योजनांतर्गत शेतकऱ्यांना एकूण आर्थिक मदत 15,000 रुपये करण्यावर विचार करत आहे. (हेही वाचा -PM Kisan 19th Instalment Date: शेतकर्‍यांना कधी मिळणार पीएम किसना योजना चा 19 वा हफ्ता?)

नैसर्गिक शेतीला चालना -

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यातील 25 लाख हेक्टर शेती नैसर्गिक शेतीखाली आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत आठ हजार कोटी रुपयांची विम्याची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी कृषी आणि विज्ञानाची सांगड घालणे आवश्यक आहे. सध्या जगभरात नैसर्गिक शेतीचे प्रयोग केले जात आहेत. नैसर्गिक शेतीचा वापर करून उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असंही यावेळी मुख्यमंत्र्यानी नमूद केलं. (हेही वाचा - PM Kisan Samman Nidhi Installment: खूशखबर! 9.4 कोटी शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जारी केला किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता)

25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आणण्याचे उद्दिष्ट -

तथापी, शेतीत रासायनिक वापर टाळणे आणि विषमुक्त नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याची आवश्यकताही यावेळी त्यांनी व्यक्त केली. नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी राज्य सरकार येत्या तीन वर्षांत 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवून नैसर्गिक शेती मोहीम राबवणार येणार असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.