Gokul Milk Price Hike: गोकूळ दुधाच्या खरेदी-विक्रीच्या किंमतीत वाढ, येत्या 11 जुलै पासून नवे दर लागू होणार

हे नवे दर 11 जुलै पासून लागू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे जरी दूध उत्पादकांना दिलासा मिळणार असला तरीही नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

Kolhapur Gokul Dudh Sangh | (File Photo)

Gokul Milk Price Hike:  गोकूळ दुधाच्या खरेदी-विक्रीच्या किंमतीत वाढ होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. हे नवे दर 11 जुलै पासून लागू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे जरी दूध उत्पादकांना दिलासा मिळणार असला तरीही नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. दोन महिन्यांआधी झालेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणूकीनंतर हा मोठा निर्णय घेतला आहे. गोकूळ दूध उत्पादकांकडून म्हशीच्या दूध खरेदीच्या किंमतीत 2 रुपये तर गाईच्या दूध दरात 1 रुपयांनी वाढ केल्याचा निर्णय घेतला आहे. या बद्दल मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांच्या झालेल्या पत्रकार परिषेदत घोषणा करण्यात आली आहे.

गोकूळ दुधाच्या खरेदी विक्रीत वाढ होणार असल्याने त्याचा मुंबई, पुणेकरांना फटका बसणार आहे. दुधाचे दर आता 2 रुपयांनी वाढणार असून हे दर 11 जुलै पासून लागू होतील. याआधी अमूल दूधाच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती.(कोल्हापूर: गोकुळ दूध संघ मुख्य कार्यालयावर शिवसेना कार्यकर्त्यांचा धडक मोर्चा, पशुखाद्याचे वाढीव दर कमी करण्याची मागणी)

दरम्यान, गोकुळ दूध संघावर गेली तीन दशके महाडिक गटाची सत्ता होती. ही सत्ता अनेक प्रयत्न करुनही विरोधकांना उलथवून लावता आली नव्हती. या वेळी मात्र विरोधकांना हे शक्य झाले. विरोधकांची सत्ता आणण्यात आणि महाडिक गटाच्या सत्तेला सुरुंग लावण्यात विश्वास पाटील यांचा मोठा हात होता. विश्वास पाटील यांना सोबत घेण्यासाठी सतेज पाटील गटाकडून गेले बरेच दिवस प्रयत्न सुरु होते. अखेर विश्वास पाटील सतेज पाटील गटासोबत आले आणि परिवर्तन घडले.

तर गोकूळच्या अध्यक्ष पदासाठी अरुण डोंगळे आणि विश्वास पाटील यांच्यात मोठी रस्सीखेच होती. अरुण डोंगळे हे या आधीही गोकुळचे अध्यक्ष राहिले आहेत. मात्र, अखेरच्या क्षणी विश्वास पाटील यांच्या नावाला सर्वांची पसंती मिळाली आणि अध्यक्ष पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. गोकुळ दूध संघ अध्यक्ष पदाची निवडणूक ही गोकुळ शिरगाव एमआयडीसी कार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी झालेल्या बैठकीत विश्वास पाटील यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले.