कोल्हापूर: खुर्च्या बांधून ठेवल्या! गोकूळ दूध उत्पादक संघ सर्वसाधारण सभा वादळी ठरण्याची शक्यात
त्यामुळे या वेळी सर्वच नेते सावध भुमिका घेताना दिसत आहेत.
गोकूळ दूध उत्पादक संघाची सर्वसाधारण सभा आज (बुधवार, 30 ऑक्टोबर 2019) पार पडत आहे. जिल्हा सहकारी दूध उत्पादक (Zilla Sahakari Dudh Utpadak Sangh) असलेल्या या संघाची आजची सभा प्रचंड वादळी ठरण्याची शक्यता आहे. या सभेचा गेल्या काही वर्षांतील इतिहास पाहता तो प्रचंड संघर्ष, गोंधळ, शक्तीप्रदर्शन, खुर्च्यांची फेकाफेक असा राहिला आहे. त्यातच या वेळी गोकूळ दूध उत्पादक संघ (Gokul Dudh Utpadak Sangh) मल्टिस्टेट करण्याबाबतचा विषय चर्चेला येण्याची शक्यता आहे. गतवर्षी या निर्णयाच्या ठरावाला सतेज पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके, माजी आमदार संपतराव पवार यांनी विरोध केला होता. यावेळी या सभेत प्रचंड राडा झाला होता. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आमनेसामने आल्याने गोंधळ वाढला होता. या गोंधळातच चप्पल भिरकवण्याचेही प्रयत्न झाले होते. त्यामुळे ही सभा काही मिनिटांतच गुंडाळावी लागली होती. या पार्श्वभूमिवर आजच्या सभेत काय होते याकडे कोल्हापूरचे (Kolhapur) लक्ष लागले आहे. दरम्यान, खुर्च्यांच्या फेकाफेकीचा इतिहास पाहता या वेळी खुर्च्या सभास्थळी बांधून ठेवण्यात आल्याचे वृत्त आहे.
गोकूळ दूध उत्पादक संघ मल्टिस्टेट करण्याच्या निर्णयाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला होता. त्यामुळे या वेळी सर्वच नेते सावध भुमिका घेताना दिसत आहेत. दरम्यान, दूध उत्पादक जर मल्टिस्टेटच्या विरोधात असतील तर मीही दूध उत्पादकांच्या सोबत आहे, अशी भूमिका गोकूळ दूध संघाचे नेते अरुण डोंगळे यांनी घेतली आहे. तर, मल्टिस्टेट झाला तरी दूध संघ खासगी होणार नाही. तो दूध उत्पादकांचाचर राहणार असल्याचे गोकूळ नेते पी.एन. पाटील आणि माजी आमदार महादेराव महाडिक यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मल्टिस्टेटच्या ठरावाबाबत रणनिती ठरविण्यासाठी आमदार सतेज पाटील आणि आमदार हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांची बैठक सोमवारी बोलवली ङोती. या बैठकीत मल्टिस्टेटच्या मुद्द्यावर गोकूळच्या सभेत रणनिती ठरविण्यात आली. (हेही वाचा, गोकूळ दूध संघावर आयकर विभागाचा छापा, सहकार क्षेत्रात खळबळ)
दरम्यान, गोकूळच्या आजच्या सभेत पहिल्यांदा गेल्यावर्षीचे प्रोसिडिंग मंजूर करण्याचा ठराव घेण्यात येईल. मात्र, त्यानंतर गोकूळ दूध संघ मल्टिस्टेट करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे काय असे सत्ताधाऱ्यांना विचारण्यात येणार आहे.
खुर्च्या बांधल्या, पोलीस बंदोबस्त तैनात
ही सर्वसाधारण सभा कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्क येथे पार पडणार आहे. त्यासाठी ताराबाई पार्कातील गोकुळ कार्यालयाबाहेर मंडप घालण्यात आला आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून सभेसाठी सभासद दाखल होत आहेत. त्यामुळे त्यांच्या सोईसाठी हजारो खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, या खुर्च्या बांधून ठेवण्यात आल्या आहेत. तसेच, अनुचीत प्रकार टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.