GMLR Flyover दुचाकीस्वारांसाठी कायमस्वरुपी बंद होण्याची शक्यता

या फ्लायओव्हरवर मागील काही महिन्यांत अनेक अपघात झाले आहेत. गेल्या महिन्याभरात दुचाकीस्वारांना या फ्लायओव्हरवरुन प्रवास बंदी घालण्यात आली होती.

GMLR Flyover (Photo Credits: Facebook)

घाटकोपर- मानखुर्द लिंक रोड फ्लायओव्हर (Ghatkopar- Mankhurd Link Road Flyover) वर दुचाकी वाहनांवर कायमस्वरुपी निर्बंध लागण्याची शक्यता आहे. या फ्लायओव्हरवर मागील काही महिन्यांत अनेक अपघात झाले आहेत. गेल्या महिन्याभरात दुचाकीस्वारांना या फ्लायओव्हरवरुन प्रवास बंदी घालण्यात आली होती. यादरम्यान, अपघाताच्या शून्य घटना आढळून आल्या. त्यामुळे दुचाकीस्वारांसाठी हा फ्लायओव्हर कायमचा बंद होण्याची शक्यता आहे.  (BKC Flyover Collapsed: मुंबईत बिकेसी येथील Under Construction असलेल्या उड्डाणपुलाचा भाग कोसळला, 13 कामगार जखमी झाल्याची माहिती)

या फ्लायओव्हरवरुन हायटेन्शन वायर जात असल्यामुळे अवजड वाहनांना या फ्लायओव्हरवरुन प्रवास करण्याची बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 1 ऑगस्ट रोजी या फ्लायओव्हरचे उद्घाटन झाले होते. उद्घाटनाच्या अगदी महिन्याभरातच सुमारे 30 अपघात या फ्लायओव्हरवर घडून आले. यापैकी एका अपघातात युसूफ खान या व्यक्तीचा मृत्यू देखील झाला होता. खान हा दुचाकीस्वाराच्या मागे बसला होता. दुचाकी फ्लायओव्हरवरुन घसल्यानंतर झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला.

दुचाकीस्वार, पादचारी आणि सायकलस्वार यांना या फ्लायओव्हरवर प्रवेश करण्यास 2 सप्टेंबरपासून बंदी घालण्यात आली होती. अवजड वाहनांना देखील  बंदी असल्याने केवळ हलकी वाहने या फ्लायओव्हरवरुन जात होती.

दरम्यान, या फ्लायओव्हरवरुन जाणाऱ्या दुचाकीस्वारांना आम्ही निर्बंध लावला होता. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 300 हून अधिक दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे. तसंच हा फ्लायओव्हर प्रवासासाठी अधिक सुरक्षित करण्यासाठी बीएमसीने काम सुरु केले आहे.

दुचाकीस्वारांसाठी हा फ्लायओव्हर बंद करणे खूप कठोर निर्णय असेल. या फ्लायओव्हरचा खालचा रस्ता पार्किंग, कचरा टाकण्यासाठी वापरला जात आहे. तसंच  फ्लायओव्हरच्या खालच्या रस्त्यामध्ये अनेक खड्डे देखील आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांना प्रवास करणे कठीण जात आहे.