Ghatkopar Hoarding Collapse Accident: घाटकोपर येथे होर्डिंग कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 14 वर; 74 जणांचा वाचवण्यात यश
हे होर्डिंग अंदाजे 17,040 स्क्वेअर फूट होते आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सर्वात मोठा होर्डिंग म्हणून देखील त्याचा उल्लेख करण्यात आला होता.
Ghatkopar Hoarding Collapse Accident: मुंबईला (Mumbai) काल पावसाने चांगलेच झोडपले. शहरातील विविध भागात मुसळधार पाऊस झाला. अशात घाटकोपर (Ghatkopar) परिसरात धुळीचे वादळ आले, त्यामुळे एक मोठे होर्डिंग (Hoarding) कोसळले. आता या अपघातामधील मृतांचा आकडा 14 वर पोहोचला असून, अनेक लोक जखमी झाले आहे. आतापर्यंत 74 जणांचा वाचवण्यात यश आले आहे. होर्डिंगखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या पथकांनी रात्रभर बचावकार्य केले. महापालिकेच्या परवानगीशिवाय हे होर्डिंग उभारण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पंत नगरमधील ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेच्या बाजूला असलेल्या एका पेट्रोल पंपावर ज्या वेळी हे होर्डिंग पडले, त्यावेळी तिथे अनेक लोक उपस्थित होते. हे होर्डिंग अंदाजे 17,040 स्क्वेअर फूट होते आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सर्वात मोठा होर्डिंग म्हणून देखील त्याचा उल्लेख करण्यात आला होता.
बीएमसीच्या म्हणण्यानुसार, त्या ठिकाणी चार होर्डिंग्ज होते आणि त्यातील तिघांना मान्यता दिली होती. मात्र हे होर्डिंग्ज लावण्यापूर्वी एजन्सी/रेल्वेने बीएमसीकडून कोणतीही परवानगी/एनओसी घेतलेली नव्हती. या अपघातानंतर मेसर्स इगो मीडिया या बिलबोर्डची निर्मिती करणाऱ्या एजन्सीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती, त्यानंतर बीएमसीने एफआयआर नोंदवला आहे. बीएमसीने म्हटले आहे की, त्यांच्यातर्फे जास्तीत जास्त 40x40 चौरस फूट आकाराचे होर्डिंग्ज लावण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, पडलेल्या होर्डिंगचा आकार 120x120 चौरस फूट होता. परवानगी नसल्यामुळे बीएमसीने एजन्सीला (M/s Ego) सर्व होर्डिंग्ज तात्काळ काढून टाकण्याची नोटीस बजावली आहे.
पहा पोस्ट-
बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले, बीएमसी वर्षभरापासून होर्डिंग्ज लावण्यावर आक्षेप घेत होती. होर्डिंग्ज दिसावेत म्हणून छेडा नगर जंक्शनजवळ आठ झाडांना विषबाधा करण्यात आली होती. झाडांच्या मुळांमध्ये केमिकल टाकून ती सुकवली गेली. या संदर्भात बीएमसीने 19 मे 2023 रोजी एफआयआर दाखल केला होता. (हेही वाचा: Mumbai Dust Strom: मुसळधार पावसाने मुंबईला झोडपले; अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह उठले धुळीचे लोट)
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आणि जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचे सांगितले. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घटनास्थळी भेट देऊन, घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले.