सांगली: सामुहिक बलात्कार आणि खून प्रकरणात 7 वर्षांनी शिक्षा; प्रियकरासह तीनही आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप

सांगली जिल्ह्यातील विटा (Vita) तालुक्यातील गार्डी येथे 2012 साली युवतीचा सामुहिक बलात्कार करून खून करण्यात आला होता. याप्रकरणी तब्बल सात वर्षांनी न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे.

सामुहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील आरोपी (संग्रहित संपादित प्रतिमा)

सांगली जिल्ह्यातील गार्डी (Gardi) येथील बलात्कार (Rape) प्रकरण राज्यभर गाजले होते. काल या प्रकरणाचा निकाल लागला. सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने प्रियकरासह तिघांना मरेपर्यंत जन्मठेप सुनावली आहे. सांगली जिल्ह्यातील विटा (Vita) तालुक्यातील गार्डी येथे 2012 साली युवतीचा सामुहिक बलात्कार करून खून करण्यात आला होता. याप्रकरणी तब्बल सात वर्षांनी न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे. तसेच प्रत्येक आरोपीने 25 हजार, अशाप्रकारे 75 हजार युवतीच्या कुटुंबास देण्याचाही आदेश दिला आहे.

मृत युवती व लक्या सरगर यांच्यात प्रेमसंबंध होते. यातूनच ही मुलगी घरातून गायब झाली होती. 12 ऑक्टोबर 2012 साली या युवतीवर बलात्कार करण्यात आला. 16 ऑक्टोबर 2012 साली या युवतीचा मृतदेह विहिरीत सापडला होता. तपासणीत हिच्यावर सामुहिक बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. लक्या सरगर याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने अनुज बाबर, दादासो आठवले, आणि सागर हत्तीकर या मित्रांसोबत तिच्यावर सामूहिक बलात्कार करून, तिचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी तिला विहरीत टाकून देण्यात आले होते. (हेही वाचा: तरुणीवर पाच जणांकडून सामूहिक बलात्कार, घटनेचा Video Viral; आरोपी, पीडिता एका कॉलेजचे विद्यार्थी)

काल या प्रकरणाची अंतिम सुनावणी पार पडली. यामध्ये सरकारी पक्षाने एकूण 20 साक्षीदारांचा जबाब नोंदवले. तसेच ही घटना कोपर्डीप्रमाणेच गंभीर असल्याचे नमूद केले. याबाबत अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती उज्वला नंदेश्वर यांनी आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप आणि पुरावा नष्ट केल्याचा प्रयत्न केल्याने 7 वर्षांचा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.