FYJC Admission 2019: अकरावी प्रवेशप्रक्रियेची दुसरी यादी 22 जुलैला होणार जाहीर, मात्र पहिल्याच यादीत 80 टक्के जागा फुल्ल
मात्र मंगळवारी (16 जुलै) जाहीर झालेल्या अकरावीच्या पहिल्या यादीत (First Merit List) मुंबईतील नामांकित महाविद्यालयांमधील 80 टक्के जागा फुल्ल झाल्या आहेत.
अकरावी प्रवेश (FYJC Admission) प्रक्रियेबाबत नेहमी प्रमाणेच गोंधळ पाहायला मिळाला. मात्र मंगळवारी (16 जुलै) जाहीर झालेल्या अकरावीच्या पहिल्या यादीत (First Merit List) मुंबईतील नामांकित महाविद्यालयांमधील 80 टक्के जागा फुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे आता येत्या 22 जुलैला जाहीर होणाऱ्या दुसऱ्या यादीसाठी (Second Merit List) अवघ्या 25 टक्क्यांपर्यंत जागा विद्यार्थ्यांसाठी शिल्लक राहिल्या असल्याचे सांगितले जात आहे.
मुंबईसह उपनगरांमध्ये असलेल्या नामांकित महाविद्यालयाच्या जागा पहिल्या यादीमध्येच फुल्ल झाल्या आहेत. अशा महाविद्यालयात जवळजवळ 500 ते 1500 पर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतो. मात्र आता पहिल्या यादीनुसार जर 80 टक्के जागा पूर्ण झाल्या असतील तर दुसऱ्या यादीमधील विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळणार की नाही याची शंका व्यक्त केली जात आहे.
तर दुसऱ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांनी अर्जात भरलेल्या महाविद्यालयांच्या प्राधान्यक्रमात बदल करता येणार आहे. तसेच प्राधान्यक्रम बदलण्यासाठी आज (18 जुलै) आणि 19 जुलै हा कालावधी देण्यात आला आहे. परंतु जे विद्यार्थी प्राधान्यक्रम बदलणार नाहीत त्यांना पहिल्या प्राधान्यक्रमानुसार ग्राह्य धरले जाणार आहे. त्याचसोबत महाविद्यालयांमध्ये रिक्त असलेल्या जागांची माहिती https://mumbai.11thadmission.net/ या संकेतस्थळावरुन विद्यार्थ्यांना मिळणार आहे.