Free Rides for Women: महिला दिनानिमित्त 8 मार्च रोजी स्त्रियांसाठी मोफत बस सेवा, जाणून घ्या सविस्तर
दिनांक 28 फेब्रुवारी 1909 रोजी, न्यू यॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला होता.
मीरा भाईंदर-म्युनिसिपल कॉर्पोरेशन (MBMC) च्या सार्वजनिक वाहतूक युनिटने 8 मार्च, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त (International Women's Day) महिलांना मोफत प्रवासाची (Free Rides) ऑफर दिली आहे. मीरा भाईंदर-म्युनिसिपल कॉर्पोरेशनने 2021 मध्ये ही सेवा सुरू केली होती. अधिकृत आकडेवारीनुसार, 2021 मध्ये दुसऱ्या कोरोनाव्हायरस लाटेमुळे फक्त 11,552 महिला प्रवासी निर्बंधांसह मोफत प्रवासाचा आनंद घेऊ शकल्या, मात्र, गेल्या वर्षी त्यामध्ये वाढ होऊन ही संख्या 21,461 प्रवासी अशी झाली.
या उपक्रमासाठी 2021 आणि 2022 मध्ये नागरी संस्थेला अनुक्रमे 1,43,995 रुपये आणि 2,73,786 रुपये खर्च आला. आयुक्त दिलीप ढोले म्हणाले की, हा महिलांच्या कौतुकासाठी छोटासा उपक्रम आहे. सर्व मार्गांवर चालणाऱ्या बसेस या दिवशी महिलांसाठी मोफत असतील.
सध्या नागरी प्रशासनाकडे 74 बसेस आहेत, ज्यात 59 नियमित बसेस, पाच एसी व्हॉल्वो आणि 10 मिडी आहेत. बाहेरील 18 मार्गांवर सत्तर गाड्या आहेत. मीरा-भाईंदर महानगरपालिका परिवहन बस सेवा हळूहळू शहराबाहेरील अधिक भागांमध्ये पोहोचत असल्याने, एकाच दिवशी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या 90,000 वर पोहोचली आहे, जी नागरी संस्थेद्वारे चालवल्या जाणार्या बसेस सुरू झाल्यापासून सर्वाधिक आहे. (हेही वाचा: PMPML चा संप मिटल्याने पुणेकरांना दिलासा; थकबाकी मिळाल्याने ठेकेदारांकडून संप मागे)
विशेष म्हणजे, प्रत्येक महिन्याच्या 8 तारखेला महिलांना मोफत बससेवा उपलब्ध करून देण्याचा विचार नागरी संस्था करत आहे. दरम्यान, महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक 28 फेब्रुवारी 1909 रोजी, न्यू यॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला होता. पुढे 1910 च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.