Shocking! MMRDA अधिकारी असल्याचे भासवत घर देण्याच्या बहाण्याने 50 ते 60 जणांची फसवणूक; कोट्यावधी लाखो रुपये लुटले, दोघांना अटक
आतापर्यंत त्यांच्याकडून 50 हून अधिक लोकांची कागदपत्रे जप्त केली आहेत, तर 12 पीडितांनी त्यांच्या तक्रारीसह पोलिसांकडे संपर्क साधला आहे
जवळ जवळ 50 ते 60 जणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने एका सिव्हिल इंजिनीअरसह दोघांना अटक केली आहे. आरोपींनी लोकांची एमएमआरडीए (MMRDA) प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांसाठी राखीव सदनिका (Flat) देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली. यासाठी आरोपींनी पिडीतांच्या नावावर असलेली लाईट बिले, निवडणूक कार्ड आणि बीएमसी झोपडपट्टी ओळखपत्र यासारखी कागदपत्रे फसव्या पद्धतीने तयार केली होती. पोलिसांनी याबाबत माहिती दिली. महत्वाचे म्हणजे 2016 पासून ही फसवणूक सुरू होती
या मध्ये ज्या मध्यमवर्गीयांना मुंबईत फ्लॅट घेणे परवडत नाहीत त्यांना टार्गेट करण्यात आले होते. या प्रकरणी शरद अडसुळे (49) हा सिव्हिल इंजिनीअर आणि राजेश मिश्रा (39) अशा दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनी मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण एजंट आणि काही वेळा एजन्सीचे अधिकारी असल्याचे भासवून 50 हून अधिक लोकांना फसवले होते. या लोकांना आश्वासन देण्यात आले की, त्यांना एसआरए (झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण) मध्ये फ्लॅट वाटप केले जातील, जे रस्ता रुंदीकरणात झोपड्या किंवा सदनिका गमावलेल्या इ. एमएमआरडीएच्या प्रकल्पग्रस्तांसाठी राखीव आहेत.
आरोपी 1994 पूर्वीची बनावट बॅक-डेटेड इलेक्ट्रिक बिले, निवडणूक ओळखपत्र आणि नागरी संस्थेने पीडितेच्या नावाने कथितपणे जारी केलेले झोपडपट्टी ओळखपत्र तयार करायचे. ही कागदपत्रे केवळ पीडितांना फसवण्यासाठी होती आणि ती कधीही एमएमआरडीएकडे सादर केली गेली नाहीत, असे उघड झाले. अशाप्रकारे आरोपींनी पिडीत लोकांकडून लाखो रुपये उकळले. फ्लॅट मिळण्याच्या आशेने लोकांनी 15 ते 20 लाख रुपयेही दिले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. (हेही वाचा: Fraud: टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने 4 बेरोजगार तरुणांची फसवणूक, गुन्हा दाखल)
गुन्हे शाखेच्या युनिट 8 ला त्यांच्या कारवायांची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून या दोघांना गेल्या आठवड्यात चेंबूर येथून अटक केली. आतापर्यंत त्यांच्याकडून 50 हून अधिक लोकांची कागदपत्रे जप्त केली आहेत, तर 12 पीडितांनी त्यांच्या तक्रारीसह पोलिसांकडे संपर्क साधला आहे आणि त्यांचे जबाब नोंदवले आहेत. अशा प्रकारे फसवणूक झाली असल्यास लोकांनी पुढे येऊन तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.