माजी खासदार संजय काकडे यांना पुणे पोलिसांकडून अटक; जाणून घ्या काय आहे प्रकरण
गुन्हेगार गजानन मारणे याने मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे वर काढलेल्या काररॅली प्रकरणात संजय काकडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) यांना पुणे पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. गुन्हेगार गजानन मारणे (Gajanan Marne) याने मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे (Mumbai Pune ExpressWay) वर काढलेल्या काररॅली प्रकरणात संजय काकडे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. आज दुपारी त्यांना शिवाजी नगर कोर्टात (Shivajinagar Court) हजर केले जाणार आहे, अशी माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune Police Commissioner Amitabh Gupta) यांनी दिली. दरम्यान, यापूर्वी काकडे यांना पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते.
तळोजा तुरुंगातून सुटल्यावर गुंड गजानन मारणे याने मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर जंगी मिरवणूक काढली होती. यात मिरवणूकीत शेकडो कार्स होत्या. यात संजय काकडे यांच्या वाहनांचा देखील समावेश होता, अशी माहिती आहे. याचे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गजानन मारणेसह इतरांवर गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, या प्रकरणात बंडगार्डन पोलिसांनी आज सकाळी काकडे यांना अटक केली आहे.
पप्पू गावडे आणि अमोल बधे यांच्या खून खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजा मारणे च्या साथीदारांनी मिरवणूक काढली होती. यात जवळपास 300 गाड्या होत्या. यावेळी उर्से टोलनाक्याजवळ फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली होती. टोलनाक्यावर टोल न भरणे, दहशतीचे वातावरण पसरवणे यांसारखे गुन्हे गजानन मारणे याच्यावर दाखल झाले आहेत.
संजय काकडे भाजपचे माजी खासदार असून त्यांना मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यातही अटक करण्यात आली होती. मेहुणे युवराज ढमाले यांना धमकावल्याप्रकरणी काकडे यांच्यासह पत्नी उषा काकडे यांना चतुःश्रृंगी पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.