माजी मंत्री Aaditya Thackeray 21 ते 23 जुलै दरम्यान ठाणे, नाशिक आणि औरंगाबाद दौऱ्यावर; शिवेसेनेला पुन्हा बळ देण्यासाठी शिव संवाद यात्रेची घोषणा
आदित्य ठाकरे गुरुवारी भिवंडी, शहापूर (ठाणे), इगतपुरी आणि नाशिकचा दौरा करणार आहेत, अशी माहिती शिवसेना आमदार आणि पक्षाचे औरंगाबाद अध्यक्ष अंबादास दानवे यांनी प्रसिद्धी पत्रकात दिली.
शिवसेना आमदार आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) पुढील तीन दिवसांत ठाणे, नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. यावेळी ते काही ठिकाणी सभांना संबोधित करतील, अशी माहिती पक्षाच्या एका नेत्याने बुधवारी दिली. आदित्य यांनी शिवेसेनेला पुन्हा बळ देण्यासाठी शिव संवाद यात्रेची घोषणा केली आहे. हा दौरा एकूण 3 दिवसांचा असणार आहे. या दौऱ्यामध्ये उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा पिंजून काढला जाणार आहे. यानंतर राज्यात इतर ठिकाणीही ठाकरे दौरा करणार आहेत.
आदित्य ठाकरे गुरुवारी भिवंडी, शहापूर (ठाणे), इगतपुरी आणि नाशिकचा दौरा करणार आहेत, अशी माहिती शिवसेना आमदार आणि पक्षाचे औरंगाबाद अध्यक्ष अंबादास दानवे यांनी प्रसिद्धी पत्रकात दिली. आदित्य ठाकरे नाशिकमधील मनमाड येथे सभेला संबोधित करणार आहेत. शुक्रवारी दुपारी ते औरंगाबादला पोहोचतील आणि संत एकनाथ रंगमंदिर सभागृहात सभेला संबोधित करतील, असे दानवे यांनी सांगितले. शनिवारी ते औरंगाबादमधील पैठण आणि त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे रॅली काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या महिन्यात शिवसेना विधीमंडळ पक्षात फूट पडल्यानंतर, मंगळवारी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला नवा धक्का बसला. त्यांच्या 19 लोकसभा सदस्यांपैकी 12 सदस्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा दर्शवला. औरंगाबाद जिल्ह्यातील सहापैकी पाच सेनेचे आमदार शिंदे कॅम्पमध्ये दाखल झाले आहेत.
महाराष्ट्रातील सत्ता गमावलेले शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी सांगितले की, महाराष्ट्रातील बंडखोर गटातून ज्या प्रकारच्या टीकात्मक टिप्पण्या येत आहेत, यावरून पक्ष नेतृत्व आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्धचा त्यांचा द्वेष आणि मत्सर उघड होतो. पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, 'गद्दार' गेले आहेत आणि ज्यांना शिवसेना अध्यक्ष आणि उद्धव ठाकरे चांगले वाटतात असे अजूनही पक्षासोबत आहेत. (हेही वाचा: शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाला 29 जुलै प्रतिज्ञा पत्र सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश, पुढील सुनावणी 1 ऑगस्टला)
दरम्यान, शिवसेना आणि त्यांच्या बंडखोर आमदारांनी दाखल केलेल्या याचिकांमध्ये अनेक घटनात्मक प्रश्न उपस्थित केले आहेत आणि मोठ्या खंडपीठाने त्यावर विचार करण्याची गरज असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी सांगितले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने दोन्ही बाजूंना 29 ऑगस्ट पर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करणयाचे आदेश दिले. तसेच, या प्रकरणाची सुनावणी आता 1 ऑगस्टला होईल असे म्हटले.