ICICI Bank -Videocon Loan Fraud Case: चंदा कोचर आणि दीपक कोचर यांना 3 दिवसांची सीबीआय कोठडी

आयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांनी बँकेचे नियम डावलून व्हिडिओकॉन ग्रुपचे प्रमोटर वेणुगोपाल धूत यांच्या कंपनीसाठी कर्ज मंजूर केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

Former MD & CEO of ICICI bank Chanda Kochhar & Deepak Kochhar | Twitter/ANI

सीबीआयने ICICI बँकेच्या माजी सीईओ आणि एमडी चंदा कोचर (Chanda Kochar) आणि त्यांचे पती दीपक कोचर (Deepak Kochar)  या दोघांना काल अटक केल्यानंतर आज स्पेशल सीबीआय कोर्ट (Special CBI Court) कडून त्यांना 3 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. या दोघांवरही व्हिडिओकॉन ग्रुपला (Videocon Group) दिलेल्या 3250 कोटींच्या लोनमध्ये अनियमितता असल्याचा आरोप आहे.

59 वर्षीय चंदा कोचर यांनी 2018 मध्येच ICICI बँकेत आपला राजीनामा दिला आहे. मात्र 1 मे 2009 दिवशी आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ झाल्यानंतर चंदा कोचर यांनी बँकेचे नियम डावलून व्हिडिओकॉन ग्रुपचे प्रमोटर वेणुगोपाल धूत यांच्या कंपनीसाठी कर्ज मंजूर केल्याचा आता त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. व्हिडिओकॉनला कर्ज देण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. त्या समितीत चंदा कोचर होत्या. चंदा कोचर यांनी सीईओ पदाचा गैरवापर करून कर्ज दिल्याचं सीबीआयने एफआयआरमध्ये म्हटलं आहे.

व्हिडिओकॉनला कर्ज उपलब्ध करून देताना त्याच्या बदल्यात चंदा कोचर यांनी पतीचा व्यावसायिक फायदा करून दिला असाही सीबीआयचा आरोप आहे.

ICICI बँक आणि व्हिडिओकॉन ग्रुपचे गुंतवणूकदार अरविंद गुप्ता यांनी पहिल्यांदा पत्र लिहून कर्ज देताना नियमांची पायमल्ली झाल्याचं सांगत याबाबत तपास व्हावा अशी मागणी केली त्यानंतर 2018 मध्ये बॅंकेच्या एका कर्मचार्‍यानेही थेट मॅनेजमेंटवर घोटाळ्याचे आरोप करत चंदा कोचर यादेखील या घोटाळ्यात सहभागी आहेत असा आरोप केला होता. (हेही वाचा, चंदा कोचर यांच्या ‘बायोपिक’ प्रदर्शनावर दिल्ली उच्च न्यायालयाची बंदी).

भ्रष्टाचार निर्मूलन कायद्या अंतर्गत FIR दाखल झाली. ED नेही चंदा कोचर यांचे पती दीपक यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. यानंतर ईडीने कोचर दांम्पत्याची मालमत्ता जप्त केली.