ठाणे: जय श्रीराम म्हणण्यासाठी मुस्लिम तरुणाला धमकावणाऱ्या तिघांना अटक
असाच एक प्रकार ठाण्यातून समोर आला आहे.
सध्या 'जय श्रीराम' म्हणण्यावरुन देशात धार्मिक वाद पेटलेला दिसत आहे. असाच एक प्रकार ठाण्यातून समोर आला आहे. जय श्रीराम म्हणण्यावरुन कारचालकाला मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. 29 जूनपर्यंत त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
फैसल उस्मान खान (25) असे या पीडित तरुणाचे नाव असून तो मुंब्रा येथे राहतो. तो ओला कंपनीत कारचालक म्हणून काम करतो. रविवारी पहाटे दिव्यातील आगासन रोडवरुन भाडे घेत त्याने कार चालू करण्याचा प्रयत्न केला. मात्र कार मध्येच बंद पडली. त्यावेळी त्याठिकाणी दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी कार का बंद झाली अशी विचारणा केली. दरम्यान शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. हा सर्व प्रकार पाहून कारमधील प्रवासी निघून गेला. अधिक मारहाण न करता सोडून देण्याची विनवणी करणाऱ्या खानला आरोपींनी 'जय श्रीराम' म्हणण्यास धमकावले. (पश्चिम बंगाल: 'जय श्री राम' म्हणायला नकार दिल्याने मुस्लिम तरुणाला धावत्या ट्रेन मधून बाहेर फेकले)
त्यानंतर दुसऱ्या दिवशी फैसल खान याने मुंब्रा पोलिस स्थानकात याबाबत तक्रार दाखल केली. तसंच आरोपींच्या दुचाकीचा नंबरही पोलिसांना दिला. यावरुन शोध घेत पोलिसांनी मंगेश मुंढे (30), अनिल सूर्यवंशी (22) आणि जयदीप मुंढे (26) या तिघांना अटक केली.
ANI ट्विट:
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिघंही दिव्यात राहत असून दारुच्या नशेत त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.