Vile Parle Fire: विलेपार्लेतील 13 मजली Suvidha Pearl इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबईतील विलेपार्ले येथील 13 मजली 'सुविधा पर्ल' या निवासी इमारतीला आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून सध्या आग विझवण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने यात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
मुंबई: मुंबईतील विलेपार्ले पश्चिम भागात असलेल्या 'सुविधा पर्ल' या १३ मजली निवासी इमारतीला आज दुपारी भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. इमारतीतून धुराचे लोट बाहेर पडत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मुंबई अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत आतापर्यंत कोणतीही व्यक्ती जखमी झालेली नाही.
अग्निशमन दलाचे बचाव कार्य
आगीची तीव्रता लक्षात घेता, अग्निशमन दलाच्या किमान सहा गाड्या आणि पाण्याचे टँकर तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आले आहेत. अग्निशमन दलाने या आगीला 'लेव्हल-२' घोषित केले असून इमारतीत अडकलेल्या रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. आग विझवण्यासाठी जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
आगीचे कारण अस्पष्ट
सुविधा पर्ल या इमारतीला नक्की कोणत्या कारणामुळे आग लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, आग पूर्णपणे विझल्यानंतर आणि कुलिंग ऑपरेशन संपल्यानंतरच आगीच्या नेमक्या कारणाचा शोध घेतला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जीवितहानी टळली
सुदैवाने, आगीची घटना समजताच इमारतीमधील अनेक रहिवाशांनी सतर्कता दाखवत बाहेर धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शिडीच्या साहाय्याने काही रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. प्राथमिक माहितीनुसार, सर्व रहिवासी सुरक्षित असून कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून इमारतीचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.