तुकाराम मुंढे यांच्याविरोधात नागपूर पोलिसांत तक्रार दाखल; सरकारी नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप
कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) परिस्थितीमध्ये त्यांनी नागपूर (Nagpur) येथे केलेली कामे आपण सर्वजण जाणतोच.
कर्तव्यनिष्ठ, कडक, मेहनती अशी अनेक बिरुदे मिरवणारे अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) हे त्यांच्या धडाडीच्या कामामुळे ओळखले जातात. कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) परिस्थितीमध्ये त्यांनी नागपूर (Nagpur) येथे केलेली कामे आपण सर्वजण जाणतोच. अशात नागपूर येथे एका नागरिकाने गणेशपेठ पोलिसात तुकाराम मुंढे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या महापालिका आयुक्तांनी 200 लोकांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून सरकारच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप, तुकाराम मुंढे यांच्यावर करण्यात आला आहे. या तक्रारीची दखल घेत सहायक पोलिस आयुक्तांनी चौकशी सुरू केली असून यामुळे खळबळ उडाली आहे.
मनीष प्रदीप मेश्राम रा. सिरसापेठ, नागपूर या व्यक्तीने ही तक्रार दाखल केली आहे. तक्रारीमध्ये व्हिडिओही सादर केला गेला आहे, ज्यामध्ये आयुक्त तुकाराम मुंढे दिसत आहेत. हॉटेल राजवाडा पॅलेसच्या हॉलमध्ये 31 मे, 2020 रोजी झालेल्या कार्यक्रमात, 200 लोकांच्या उपस्थितीत व्यासपीठावरून भाषण करताना तुकाराम मुंढे दिसत आहेत. मेश्राम यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन झाले नाही. (हेही वाचा: महाराष्ट्रात आज कोरोनाच्या नव्या 3007 रुग्णांची भर तर 91 जणांचा बळी, राज्यातील COVID19 चा आकडा 85 हजारांच्या पार)
कोरोना साथीच्या काळात जेव्हा भारत सरकारने कोणत्याही प्रकारच्या सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमास परवानगी दिली नाही, अशावेळी या कार्यक्रमात मुंढे यांनी उपस्थित राहून सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केले. यासोबतच मुंढे यांनी अशा कार्यक्रमाचे आयोजन करून, 200 लोकांचे जीवन धोक्यात आणले असल्याचा आरोपही तक्रारीत केला आहे. मेश्राम पुढे म्हणतात, ज्या अधिकाऱ्याला शहरात कोरोना विषाणूचा उद्रेक होण्यापासून, नागरिकांचे संरक्षण करण्याचे काम सोपविण्यात आले आहे, त्याच अधिकाऱ्याने अशा नियमांचे उल्लंघन करणे हा एक गंभीर गुन्हा आहे. त्यांतर आता पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.