सरकार पडण्याच्या भितीने महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांना झोप येत नसेल- चंद्रकांत पाटील

सत्ताधारी आणि विरोधीपक्षातआरोप प्रत्यारोप सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

चंद्रकांत पाटील (Photo credit : facebook)

महाराष्ट्रावर (Maharashtra) कोरोनाचे संकट वावरत असून गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. सत्ताधारी आणि विरोधीपक्षातआरोप प्रत्यारोप सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. महत्वाचे म्हणजे, मध्य प्रदेश आणि राजस्थानप्रमाणे महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस (Opration Lotus) राबवले जाणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. याच मुद्यावरून भाजप प्रेदशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. तसेच सरकार पडण्याच्या भितीने महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांना झोप येत नसेल, त्यांना झोपेच्या गोळ्या घेण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

चंद्रकांत पाटील यांची नुकतीच कोल्हापूर येथे पत्रकार परिषद पार पडली आहे. मराठा आरक्षणावर बोलत असताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांना झोपेच्या गोळ्या घेण्याची गरज आहे. कारण सरकार आता पडेल की नंतर, या भीतीने त्यांना झोप येत नसेल. पण तुम्ही सरकार चालवा, आम्ही ते पाडण्यासाठी प्रयत्न करणार नाही, असा टोला पाटील यांनी लगावला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. सुमारे दीड तास त्यांच्यात चर्चा सुरु होती. त्यामुळे मध्यप्रदेश, राजस्थाननंतर महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस राबवले जाणार की काय? असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र, त्याच दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन, असे काहीही नसल्याचे स्पष्ट केले होते. हे देखील वाचा- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटायला गेलेल्या देवेंद्र फडणवीस यांना राज्यात शेवटी कटोरा घेऊन फिरावे लागेल- नितीन राऊत

दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात चंद्रकांत पाटील म्हणाले की, मागासवर्गीय आयोगाचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. सात महिन्यांपासून आयोगाचे ऑफिस बंद आहे. मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना हे कार्यालय बंद असणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले आहेत. याशिवाय दूध दरवाढीसाठी भाजपाकडून 1 ऑगस्टला आंदोलन करणार आहे. त्याची तयारी सुरु आहे. रासप, रयत क्रांती, रिपाइं या संघटनाही या आंदोलनात सहभागी होणार आहेत. आमचे आंदोलन हिसंक नसेल. अधिकाऱ्यांना दूध भेट देणे आणि परवानगी मिळाली, तर देवाला दूध अर्पण करणे, असे आंदोलनाचे स्वरूप असेल, अशी माहिती पाटील यांनी दिली आहे.