FASTag मुळे प्रवाशांची वाढलीय डोकेदुखी, मुंबई-पुणे महामार्गावरील उर्से टोलनाक्यावर पाहायला मिळाल्या लांबच लांब रांगा
यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
देशभरात येत्या 15 फेब्रुवारीला फास्टॅग (FASTag) बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या गाड्यांना फास्टॅग नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र फास्टॅग तपासण्यापासून ते मशीनवर डिटेक्ट होईपर्यंत अनेक प्रकारांना प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय होत आहे. या दरम्यान प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आज मुंबई-पुणे महामार्गावरील (Mumbai-Pune Highway) उर्से टोलनाक्यावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
राज्यातील सर्व टोलनाक्यावर फास्टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. याची नीट अंमलबजावणी होत आहे की नाही यावर सरकारची करडी नजर असणार आहे. मात्र हा फास्टॅग स्टिकर स्कॅन होणे, न होणे, त्यानंतर अधिका-यांसोबत प्रवाशांचे तूतू-मैंमै यामध्ये पुष्कळ वेळ खर्च होत आहे. त्यामुळे प्रवाशांचे देखील अतोनात नुकसान होते आहे आणि वेळेही वाया जात आहे.हेदेखील वाचा-'हा FASTag नाही, SLOWTag होतोय' असे सांगत गीतकार संदिप खरे यांनी व्हिडिओद्वारे सांगितलेला आपल्याला आलेला वाईट अनुभव, Watch Video
दरम्यान सोमाटणे फाटा टोलनाक्यावर देखील वाहनांच्या रांगा पाहायला मिळाल्या. अनेकांना शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशी सलग सुट्टी आल्याने लोकांचे आउटिंगचे प्लान्स ठरले असतील. मात्र फास्टॅगच्या गोंधळामुळे बहुतेक टोलनाक्यांवर वाहनांची गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे हा फास्टॅग अनेकांसाठी स्लोटॅग झाल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून येऊ लागल्या आहेत.
फास्ट टॅग कुठे मिळणार?
फास्ट टॅग ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात मिळणार आहे. आरटीओ (RTO) कार्यालय, सेवा केंद्र, वाहतूक केंद्र आणि काही निवडक पेट्रोल पंपांवर आणि काही बॅंकांमध्ये फास्ट टॅग उपलब्ध करण्यात आले आहेत. बँका, इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यासारख्या ठिकाणी फास्टॅगच्या विक्रीसाठी विशेष विक्री केंद्र आहेत.
दरम्यान My FASTag App वर तुम्हांला ही केंद्र शोधता येऊ शकतात. कार, जीप्स आणि व्हॅनसाठीचे फास्टॅग हे अॅमेझॉन, पेटीएम, स्टेट बँक, ICICI बँक, अॅक्सिस बँक, HDFC बँक, IDFC फर्स्ट बँक यांच्या वेबसाईटवरून ऑनलाईन देखील विक्री साठी उपलब्ध आहेत. fastag.org/apply-online वेबसाईटही अर्ज करण्याची सोय आहे.