Farmers Suicide: मराठवाड्यात 237 दिवसांत 626 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; बीड जिल्ह्यात सर्वाधिक प्रकरणे
आत्महत्येच्या बाबतीत तामिळनाडू आणि मध्य प्रदेश दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. भारतभर अशा प्रकारची 1,64,033 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.
गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या (Maharashtra Farmers Suicide) ही मोठी चिंतेची बाब ठरली आहे. यावरून राज्याचे राजकारण वेळोवेळी चांगलेच तापले आहे. आता याबाबत मराठवाड्यातून समोर आलेली आकडेवारी धक्कादायक आहे. गेल्या 237 दिवसांत येथे 626 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. बीड जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी मृत्यूची नोंद झाली आहे. मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी धडकी भरवणारी आहे. 1 जानेवारी ते 25 ऑगस्ट या 237 दिवसांत मराठवाड्यात एकूण 626 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एकट्या बीड जिल्ह्यात 237 दिवसांत 170 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
दुसरीकडे बीड जिल्ह्यानंतर औरंगाबादमध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात 237 दिवसांत 109 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात पाच मंत्री असतानाही ही आकडेवारी अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. उस्मानाबाद (71), नांदेड (89), परभणी (50), लातूर (36) आणि हिंगोली येथे 24 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
राज्यात जुलै महिन्यानंतर मराठवाड्यात ऑगस्टमध्ये दमदार पाऊस झाला. पावसामुळे पिकांचे आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या महिन्यात मराठवाड्याच्या दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना परिस्थितीचा आढावा घेण्याचे आदेश दिले होते. सोबतच मुख्यमंत्र्यांनी लवकरच नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासनही दिले. मात्र त्यानंतर पुन्हा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची संख्या वाढली आहे. असे असताना अद्यापही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही. (हेही वाचा: मानवी तस्करी प्रकरणात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर, तर हत्येच्या घटनांबाबत तिसरा नंबर- NCRB)
दरम्यान, देशात 2021 मध्ये सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. आत्महत्येच्या बाबतीत तामिळनाडू आणि मध्य प्रदेश दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. भारतभर अशा प्रकारची 1,64,033 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीत ही बाब समोर आली आहे.