पंढरपूरात विठुरायाच्या दर्शनाचे विकले गेले बोगस पास; 6 जण चौकशीसाठी ताब्यात

यंदा आषाढी वारीला मुख्यमंत्री वगळता अन्य कोणाचीही गाडी मंदिर प्रवेशद्वाराच्या परिसरापर्यंत जाणार नाही तसेच व्हिआयपी दर्शन बंद करण्यात आले आहे.

पंढरपूरात विठुरायाच्या दर्शनाचे विकले गेले बोगस पास; 6 जण चौकशीसाठी ताब्यात
Shri Vitthal Rukmini Temple

आषाढी एकादशी च्या निमित्ताने आता अनेक वारकर्‍यांची पावलं पंढरपूरच्या दिशेने वळली आहेत. विठूनामाचा गजर करत अनेकजण सध्या दिंडी, पालख्यांसोबत पंढरपूराकडे निघाले आहेत. मात्र भाविकांची सध्या पंढरपूरात लूट होत असल्याच्या देखील घटना समोर येत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी असलेल्या काही भाविकांना मंदिर प्रवेशासाठी बनावट 'टोकन दर्शन' पास विकल्याची घटना समोर आली आहे. 100 रुपयात देतो, असे सांगून सासवड परिसरात जुन्या पासावर हे नवीन डुप्लिकेट पास बनवून दिल्याचं समोर आलं आहे. प्रवेशद्वारावर स्कॅनिंग करताना ते पास बोगस असल्याचे समजले आहे.

विठूरायाच्या दर्शनासाठी 10-12 तास रांगेत थांबण्याऐवजी अधिकृत टोकन प्रणालीमुळे अर्ध्या तासात थेट दर्शनाचा लाभ मिळतो. पण या सोयीचा काहींना गैरफायदा घेत भाविकांना लूटलं आहे. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी या प्रकरणी कडक भूमिका घेतली असून, यापुढे कुणीही असे पास विकताना आढळल्यास गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. भाविकांनी अधिकृत संकेतस्थळावरूनच मोफत टोकन बुक करण्याचे आणि अशा बनावट पासांना बळी न पडण्याचे आवाहन आता करण्यात आले आहे. Ashadhi Yatra 2025: पंढरपूर च्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कोणालाही व्हीआयपी दर्शन मिळणार नाही; पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या सूचना .

अधिकृतरित्या कसा मिळवाल टोकन पास ?

vitthalrukminimandir.org या वेबसाईटला भेट द्या. होमपेजवर पास बुकिंग वर क्लिक करून आवश्यक तपशील भरून लॉगिन करा आणि टोकन पास मिळवा. यंदा आषाढी वारीला मुख्यमंत्री वगळता अन्य कोणाचीही गाडी मंदिर प्रवेशद्वाराच्या परिसरापर्यंत जाणार नाही तसेच व्हिआयपी दर्शन बंद करण्यात आले आहे. भाविकांना दर्शनासाठी फार काळ ताटकळत उभं राहता लागू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

(The above story first appeared on LatestLY on Jun 25, 2025 04:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).