Fake Paintings Scam: मुंबईत कोट्यावधी रुपयांचा बनावट पेंटिंग घोटाळा; इन्व्हेस्टमेंट बँकरला विकली तब्बल 18 कोटींची खोटी चित्रे, गुन्हा दाखल
हे पेंटिंग मनजीत बावा नावाच्या कलाकाराचे असून त्याचे नाव 'कृष्णा विथ काउज' असल्याचे देसाई याने सांगितले. तसेच या पेंटिंगची किंमत 6.75 कोटी रुपये नमूद केली.
Fake Paintings Scam: महाराष्ट्राची राजधानी मुंबईत (Mumbai) चित्रकलेची आवड असलेल्या एका 52 वर्षीय इन्व्हेस्टमेंट बँकरची दोन लोकांनी खोटी पेंटींग्ज विकून 18 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. फ्री प्रेस जर्नलनुसार, ताडदेव येथील रहिवासी पुनीत भाटिया यांनी सोमवारी दोन लोकांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. ही फसवणूक त्यांच्यासोबत जानेवारी ते मे 2022 दरम्यान घडली. भाटिया यांनी फसवणूक करणाऱ्यांनी दिलेल्या बिलांच्या प्रती, नोटरी केलेले स्टॅम्प पेपर आणि सत्यता प्रमाणपत्रे पोलिसांसोबत शेअर केली आहेत.
पीडित भाटिया यांनी पोलिसांना सांगितले की, ते एका पार्टीत विश्वांग देसाईला भेटले होते. त्याच्याद्वारे ते राजेश राजपालला भेटले. राजेशने स्वत:ची ओळख आर्ट डीलर म्हणून करून दिली. चर्चगेट येथील आर्ट इंडिया इंटरनॅशनलमध्ये तो कार्यरत होता आणि त्याची कफ परेड येथे एक आर्ट गॅलरी होती.
भाटिया यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देसाई याने त्यांना भोपाळमध्ये राहणारे सुब्रत बॅनर्जी नावाचे निवृत्त आयएएस अधिकारी विकत असलेल्या एका पेंटिंगबद्दल सांगितले. हे पेंटिंग मनजीत बावा नावाच्या कलाकाराचे असून त्याचे नाव 'कृष्णा विथ काउज' असल्याचे देसाई याने सांगितले. तसेच या पेंटिंगची किंमत 6.75 कोटी रुपये नमूद केली. देसाई याने त्यांना अजून एक पेंटिंग दाखवले जे फ्रान्सिस न्यूटन सोझा नावाच्या कलाकाराचे होते, ज्याची किंमत 1.75 कोटी होती. भाटिया यांनी ही दोन्ही पेंटींग्ज विकत घेण्याचे ठरवले.
पुढे वेळोवेळी देसाई त्यांना आणखी काही पेंटींग्ज दाखवत गेला आणि भाटीया ती खरेदी करत राहिले. अशाप्रकारे भाटिया यांनी देसाई आणि राजेश यांच्यामार्फत एकूण 11 चित्रांची खरेदी केली ज्यासाठी त्यांनी 17.90 कोटी रुपये दिले. त्यांच्या दिल्लीच्या पत्त्यावर ही पेंटिंग्ज डिलिव्हर झाली. त्यानंतर मे महिन्यात भाटिया यांनी आपल्या काही मित्रांना दिल्लीतील आपल्या घरी बोलावले, जिथे त्यांनी ही पेंटींग्ज त्यांना दाखवली. मात्र मित्रांनी ती चित्रे बनावट असल्याचे सांगितले. (हेही वाचा: Sunil Kedar Found Guilty In NDCCB Scam: नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणात काँग्रेस आमदार सुनील केदार दोषी)
त्यानंतर भाटिया यांनी ताबडतोब मनजीत बावा यांच्या 'कृष्णा विथ काउज' या पेंटिंगबद्दल विचारण्यासाठी बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी सांगितले की, त्यांनी हे चित्र कोणालाही विकले नाही. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे भाटीया यांच्या धान्यात आले. त्यानंतर त्यांनी देसाई व राजपाल यांच्याशी संपर्क साधला, मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर देसाई यांनी तारदेव पोलिसांकडे धाव घेतली. आता देसाई आणि राजपाल यांच्याविरुद्ध कलम 120 (b), 34, 406, 420, 467, 468, 471 या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.