Jayashree Thorat Social Media Fake Account: महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मुलीच्या नावाने फेसबुकचे फेक अकाऊंट, पैशांचीही मागणी

तक्रारीसोबत या अकाऊंटवरुन आलेल्या मेसेजचे काही स्क्रीनशॉटही पोलिसांना दिले आहेत. पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली आहे. तसेच तपासही सुरु केला आहे.

Facebook | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

महाविकासआघाडीतील महसूलमंत्री, काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या कन्या डॉ. जयश्री थोरात (Jayashree Thorat) यांच्या नावे बनावट फेसबुक (Facebook) खाते उघडण्यात आले आहे. तसेच, या खात्यावरुन गुगल पे, फोन पे याद्वारे अनेकांकडे पैशांची मागणी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. सिद्धार्थ सुभाष थोरात यांनी याप्रकरणात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी कारवाई करुन हे खाते तत्काळपणे बंद करावे तसेच, हा खोडसाळपणा करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, असे म्हटले आहे.

अज्ञात व्यक्तीने डॉ. जयश्री यांच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते उखडून काही लोकांकडे पैशांची मागणी केली. हा प्रकार 1 ते 2 मार्चच्या मध्यरात्री घडला. या व्यक्तीने फेसबुकच्या माध्यमातून काही लोकांना मेसेज पाठवले. यात गुगल पे अथवा फोन पेच्या माध्यमातून पैसे पाठविण्याची विनंती केली. या व्यक्तीने ज्या अकाऊंटवरुन पैशांची मागणी केली. त्यावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या कन्या डॉ. जयश्री थोरात यांचा फोटो प्रोफाईलला वापरला आहे. (हेही वाचा, बाळासाहेब थोरात यांची उपमुख्यमंत्री पदी लागू शकते वर्णी? पहा काय म्हणाले अजित पवार)

सिद्धार्थ थोरात यांनी याबाबत संगमनेर पोलिस स्थानकात तक्रार दिली आहे. तक्रारीसोबत या अकाऊंटवरुन आलेल्या मेसेजचे काही स्क्रीनशॉटही पोलिसांना दिले आहेत. पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली आहे. तसेच तपासही सुरु केला आहे.

गेल्या काही काळात अशा प्रकारच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. सोशल मीडियावर कार्यरत असलेल्या किंवा फेसबुकवर फ्रेंड्सची संख्या मोठ्या प्रमाणावर असलेली खाती शोधली जातात. तशाच प्रकारची दुसरी बनावट खाती तयार केली जातात. या खात्यांवरुन नव्याने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या जातात. रिक्वेस्ट अॅक्सेप्ट केली की मग त्याद्वारे पैशांची मागणी करणारा मेसेज पाठवला जातो. सर्वसामान्य नागरिक ते सेलिब्रेटी आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या बाबतीत अशा घटना अधिक वेळा घडल्याचे पाहायला मिळत आहे.