Exam Paper Leak Case In Maharashtra: पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक

तुकारम सुपे हे महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचे आयुक्त आहेत. त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरीक्त कार्यभार सुद्धा आहे.

Tukaram Supe | (File Image)

राज्यातील सरकारी सेवेतील भरती प्रक्रिया गैरव्यवहार (Recruitment Scam) आणि पेपरफुटी प्रकरणात (Exam Paper Leak Scam) तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांना अटक झाली आहे. तुकारम सुपे हे महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचे आयुक्त आहेत. त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरीक्त कार्यभार सुद्धा आहे. म्हाडा परीक्षा (Mhada Paper Scam) गोपनियता भंग प्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत काही लोकांना आगोदरच अटक केली होती. दरम्यान, याच प्रकरणात पुणे पोलिसांनी तुकाराम सुपे यांना चौकशीसाठी बोलावले होते. या वेळी त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान, याच प्रकरणात अटक करण्यात आलेल्या डॉ. प्रीतिश देशमुख (Pritish Deshmukh) या आरोपीच्या घरी टीईटी परिक्षेचे (Maha TET exam) वेळापत्रक आढळून आले होते. त्यानंतर संशय बळावल्याने पुणे सायबर कार्यालयांमध्ये चौकशी करुन सुपे यांना अटक करण्यात आली.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) परीक्षा गैरव्यवहार होत असल्याची कुणकुण लागताच रद्द करण्यात आली. परीक्षा रद्द करण्यात आल्याने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना माफीही मागावी लागली होती. म्हाडा पेपर गोपनियता भंग प्रकरणी पुणे पोलिसांनी कारवाई करत सहा जणांना अटक करण्यात आली होती. या सहा जणांमध्ये कंत्राटदार कंपनीच्या संचालकाचाही सामावेश होता. भरती परीक्षेचे कंत्राट ‘जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीस’ कंपनीस मिळाले होते. या कंपनीनेच पेपरफुटी करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले होते. डॉ. प्रीतिश देशमुख हा या कंपनीचा संचालक आहे. त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. (हेही वाचा, मृत स्वप्नील लोणकर याचं MPSC मुलाखतीच्या यादीत नाव; एमपीएससीचा पुन्हा भोंगळ कारभार)

डॉ. प्रितीश देशमुख याला अटक केल्यावर पोलिसांचा संशय अधिक बळावाल. त्यांनी डॉ. देशमुख याच्या घराची झडती घेतली. या वेळी टीईटी परीक्षार्थींची ओळखपत्रं मोठ्या प्रमाणावर आढळून आली होती. याशिवाय विद्यार्थ्यांची हॉल तिकीट्सही आढळून आली होती. त्यामुळे टीईटी परीक्षेत झालेला गैरव्यवहार अधिक मोठ्या प्रमाणाचा असून, त्याची व्याप्तीही मोठी असल्याचा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्या दृष्टीने तपास केला असता तपासाचे धागे तुकाराम सुपे यांच्यापर्यंत असल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले. त्यानंतर पोलिसांनी तुकाराम सुपे यांना चौकशीसाठी बोलावले. त्याच वेळी त्यांना अटकही करण्यात आली.