Employment Schemes: महाराष्ट्र सरकारच्या रोजगारासंबंधी योजनांचा लाभ घेण्यासाठी Aadhaar Link व इतर माहिती अपडेट करण्याचे आवाहन; 30 सप्टेंबर पर्यंत मुदत
अशांना मदतीचा हात देण्यासाठी सरकार पुढे आले आहे. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाद्वारे लोकांना रोजगार (Employment) मिळवून दिला जात आहे
कोरोना विषाणू (Coronavirus) व त्यानंतर लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊनमुळे (Lockdown) अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अशांना मदतीचा हात देण्यासाठी सरकार पुढे आले आहे. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाद्वारे लोकांना रोजगार (Employment) मिळवून दिला जात आहे. यासाठी वेबपोर्टलवर किंवा कार्यालयात नाव नोंदणी केलेल्या बेरोजगार उमेदवारांना नोकरीसाठी सर्व सेवा, सुविधा ऑनलाइन पद्धतीने वेबसाईटच्या माध्यमातून देण्यात येतात. मात्र आता निदर्शनास आले आहे की, अनेक लोकांनी यासाठी आपली माहिती अपडेट केली नाही व आपले आधार लिंक (Aadhaar Link) केले नाही. हे करण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
आता आपल्या नाव नोंदणीमध्ये अद्यापपर्यंत आधार नोंदणी क्रमांकाचा समावेश न केलेल्या उमेदवारांनी, युजर आयडी व पासवर्ड वापरुन आधार कार्ड क्रमांकासह आवश्यक असलेली सर्व माहिती https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर 30 सप्टेंबर 2020 पर्यंत अद्ययावत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यभरात वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध रोजगार मेळाव्यांची सर्व माहिती मिळविणे व त्यासाठी उत्सुकता व पसंतीक्रम नोंदविणे, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून सहभाग मिळविणे, केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास योजना व कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्था यांची माहिती प्राप्त करणे व सहभाग घेणे, आपल्या शैक्षणिक पात्रतेत वाढ करणे, पत्ता, संपर्क क्रमांक, ई-मेल यामध्ये दुरुस्ती करणे, वेगवेगळ्या उद्योजकांनी वेळोवेळी अधिसूचित केलेल्या रिक्त पदांची माहिती मिळवून त्यासाठी उमेदवारीचा अर्ज सादर करणे आदी बाबींचा त्यात समावेश आहे.
(हेही वाचा: अंतिम वर्षाच्या नापास विद्यार्थ्यांची महिन्याभरात परीक्षा, पदवीच्या प्रमाणपत्रावर कोविडचा शेरा नाही- उदय सामंत)
आता वेबपोर्टलवर आधार लिंक न केल्यास तसेच आपली माहिती अपडेट न केल्यास वेबपोर्टलवरील नोंदणी रद्द होणार आहे. माहिती अद्ययावत करताना काही समस्या येत असल्यास कार्यालयाच्या 022-22626440 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा mumbaisuburbanrojgar@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर यांनी केले आहे.