एकनाथ शिंदे यांनी घेतली स्वप्नील लोणकर याच्या कुटुंबियांची भेट; शिवसेनेकडून 10 लाखांची मदत

त्यानंतर नेतेमंडळी त्याच्या कुटुंबियांना भेट घेऊन त्यांचे सांत्वन करत आहेत. त्याचबरोबर मदतीचा हातही पुढे केला जात आहे.

Eknath Shinde | (Photo Credits: Facebook)

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (Maharashtra Public Service Commission) परीक्षा उत्तीर्ण झालेल्या स्वप्नील लोणकर (Swapnil Lonkar) याने पुणे (Pune) येथे आत्महत्या केली. त्यानंतर नेतेमंडळी त्याच्या कुटुंबियांना भेट घेऊन त्यांचे सांत्वन करत आहेत. त्याचबरोबर मदतीचा हातही पुढे केला जात आहे. त्यातच आता शिवसेना नेते आणि नगारविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्वप्नीलच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी शिवसेनेकडून (Shiv Sena) त्यांना 10 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. तसंच स्वप्नीलच्या बहिणीच्या शिक्षणासाठी देखील मदत करणार असल्याचं आश्वासन शिंदे यांनी यावेळी दिले.

एमपीएससीचा कारभार पारदर्शक असावा. तसंच भरती प्रक्रीया लवकरात लवकर सुरु होईल, असं आश्वासन त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिला आहे. स्वप्नील लोणकर याची आत्महत्या दुर्दैवी असून या प्रकरणाची गंभीर दखल घेत 15 हजार 500 पदांची भरती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. कोरोना संटकामुळे सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहिले असले तरी राज्य सरकार संवेदनशील आहे. त्यामुळे लवकरच एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यात येईल, असेही ते म्हणाले.

एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही 2 वर्षे मुलाखत झाली नाही. त्यामुळे रखडलेली नियुक्ती, घरची आर्थिक परिस्थिती, कर्ज यामुळे स्वप्नील नैराश्यात गेला आणि त्याने टोकाचे पाऊल उचलले. यानंतर राज्यात आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण गाजले. स्वप्नीलच्या कुटुंबियांनी देखील सरकारकडे बोट दाखवले. त्यानंतर पावसाळी अधिवेशनात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या विषयावर चर्चा करण्यात आली आणि या महिनाअखेरपर्यंत विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या करणार असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील लोणकर कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर दिला होता. तसंच सरकार विद्यार्थ्यांच्या पाठिशी असल्याचे सांगून त्यांनी सर्वांना आश्वस्त केले होते.