Eknath Khadse Tests Positive For Coronavirus: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना कोरोना विषाणूची लागण; उपचारासाठी मुंबईकडे रवाना
मात्र जनसंपर्क असल्याने, समाजकारणात कार्यरत असल्याने राज्यातील अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोना विषाणूच्या (Coronavirus) बाबतीत एकेकाळी सर्वात प्रभावित असलेल्या महाराष्ट्रामधील संसर्गाचे प्रमाण आता कमी होताना दिसत आहे. मात्र जनसंपर्क असल्याने, समाजकारणात कार्यरत असल्याने राज्यातील अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आता माहिती मिळत आहे की, भारतीय जनता पार्टी सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी, एनसीपी नेता एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते.
कोरोना चाचणी सकारात्मक आल्याने उपचारांसाठी एकनाथ खडसे मुंबईकडे रवाना झाले आहेत. आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनीही आपली कोरोनाची चाचणी करून घ्यावी तसेच आपण बरे होऊ पर्यंत कोणी भेटायला येऊ नये असे खडसे यांनी सांगितले आहे. याआधी 15 नोव्हेंबर रोजी रोहिणी खडसे यांनी ट्वीट करत सांगितले होते की, त्यांची कोरोनाची चाचणी सकारात्मक आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधता म्हणुन त्या रुग्णालयात दाखल होत आहेत. रोहिणी खडसे यांच्यासोबत त्यांची मुलगी सारा ही देखील करोना पॉझिटिव्ह असून दोघींनाही जळगाव येथील हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.
रोहिणी यांची चाचणी सकारात्मक आल्यानंतर एकनाथ खडसे यांनी स्वतःला वेगळे ठेवले होते. यामुळे शरद पवार यांचा खानदेश दौराही रद्द झाला होता. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी जिल्ह्यातील नेते तसेच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली होती. त्या भेटीतूनच त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (हेही वाचा: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्षा रोहिणी खडसे कोरोना व्हायरस संक्रमित)
दरम्यान, याआधी महाराष्ट्रामध्ये अनेक आमदार, खासदार यांच्यासह अशोक चव्हाण, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, अस्लम शेख, उदय सावंत, जितेंद्र अहवाड, धनंजय मुंडे, संजय बनसोड, अब्दुल सत्तार अशा अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली होती.