SSC, HSC Exam 2021: आठवड्याभरात दहावी-बारावीच्या परीक्षांबाबतचे चित्र स्पष्ट होणार- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
यावेळी त्यांनी राज्य सरकारची परीक्षेबाबतची भूमिका मांडली.
कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बोर्डाने यंदाची दहावीची परीक्षा (SSC Exam) रद्द केली होती. सीबीएसई बोर्डाने देखील दहावीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा होणार की नाही? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पालक-विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेबाबतचा संभ्रम शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षासंदर्भात झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारची परीक्षेबाबतची भूमिका मांडली.
दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थी मागील दीड वर्षांपासून तयारी करत आहेत. मात्र परीक्षेबाबत त्यांच्या मनात पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊनच निर्णय घेतला जाईल, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. दहावी-बारावीच्या परीक्षांसंदर्भात पुढील दोन दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक घेतली जाईल आणि येत्या आठवड्याभरात परीक्षेसंदर्भातील चित्र स्पष्ट होईल, असेही त्या म्हणाल्या.
ANI Tweet:
कोरोनाचे संकट भयंकर असून तिसऱ्या लाटेची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यात लहान मुलांना अधिक धोका असल्याचे म्हटले जात आहे. तसंच कुटुंबात कोरोना पॉझिव्हीट व्यक्ती आढळल्यास त्या विद्यार्थ्याची मन:स्थिती काय असेल, याचा आपण विचार करु शकतो. त्यामुळे या संपूर्ण परिस्थितीचा विचार करुनच निर्णय घेण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या. (SSC, HSC Exam 2021: दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात 2 दिवसात निर्णय घेणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले स्पष्ट)
पुढे त्या म्हणाल्या, "कोरोनाची गंभीर स्थिती आम्ही न्यायालयासमोर मांडू आणि या सध्याच्या परिस्थितीत कोर्टही सहानभूतीपूर्वक विचार करुन निर्णय घेईल, अशी खात्री आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची आम्ही काळजी घेऊच. मात्र विद्यार्थ्यांचे आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे."