सन 2020 ते 2022 काळात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानाकरिता बाधितांना मिळणार मदत

प्रलंबित असलेल्या मदत मागणीच्या प्रस्तावातील अडथळे दूर करून या निधी वाटपास मान्यता देण्यात आली.

Maharashtra Rain | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

सन २०२० ते २०२२ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे (Natural Calamities) झालेल्या शेतीपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानाकरिता बाधितांना मदत मिळणार आहे. यासाठी १०६ कोटी ६४ लाख ९४ हजार रूपये निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली असल्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याने या निर्णयामुळे बाधितांना जलद मदत मिळेल, असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला.

सन २०२० ते २०२२ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेत पीक व मालमत्ता नुकसानाच्या मदत मिळण्यासाठी लोकप्रतिनिधी व बाधित शेतकरी व नागरिकांकडून मागणी होत होती. प्रलंबित असलेल्या मदत मागणीच्या प्रस्तावातील अडथळे दूर करून या निधी वाटपास मान्यता देण्यात आली. यामुळे संबंधित शेतकरी व बाधितांना दिलासा मिळणार आहे, अशी माहिती मंत्री अनिल पाटील यांनी दिली. (हेही वाचा: Salary Hike In India: यावर्षी खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पगारात होऊ शकते सरासरी 9.5 % वाढ; जाणून घ्या कोणाला होणार सर्वाधिक फायदा)

राज्यात सन २०२० ते २०२२ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे व इतर मालमत्तेचे नुकसान झालेल्या बाधितांना मदत करण्यासाठी विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार वेळोवेळी निधी वितरीत करण्यात आला आहे. कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे तसेच इतर काही कारणांमुळे निधी मागणीच्या काही प्रस्तावांवर कार्यवाही झाली नव्हती. त्यामुळे शेतीपिकांच्या व इतर नुकसानासाठी आवश्यक असलेल्या मदतीचे प्रस्ताव शासनास पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे सर्व विभागीय आयुक्त यांचेकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार निधी वितरणास मान्यता देण्यात आलेली आहे.