IPL Auction 2025 Live

Pune: दहावीच्या परीक्षेत हक्काचे 20 गुण देणार नाही; मुख्यध्यापकांनी दिलेल्या धमकीमुळे विद्यार्थ्याने गळफास घेत संपवली जीवनयात्रा

प्राप्त माहितीनुसार, मुख्याध्यापकांनी आयुषला अभ्यास करत नसल्याने शाळेतून काढून टाकणार, दहावीच्या परीक्षेत हक्काचे 20 गुण देणार नाही, दहावीच्या परीक्षेलादेखील बसू देणार नाही, अशा स्वरुपाच्या धमक्या दिल्या होत्या.

Suicide | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

Pune: विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यातून (Pune) अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. दहावीच्या परीक्षेत हक्काचे 20 गुण देणार नाही. अशा मुख्यध्यापकाकडून वारंवार मिळणाऱ्या धमक्यांमुळे दहावीच्या विद्यार्थ्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली आहे. विद्यार्थ्याला आत्महत्येस (Suicide) प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड येथील एका शाळेतील ही घटना घडली आहे.

आयुष गारळे असं या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, मुख्याध्यापकांनी आयुषला अभ्यास करत नसल्याने शाळेतून काढून टाकणार, दहावीच्या परीक्षेत हक्काचे 20 गुण देणार नाही, दहावीच्या परीक्षेलादेखील बसू देणार नाही, अशा स्वरुपाच्या धमक्या दिल्या होत्या. त्यानंतर आयुषने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले, असं म्हटलं जात आहे. याप्रकरणी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक हितेश शर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा - Pune Suicide Case: प्रियकराने लग्नास नकार दिल्याने 24 वर्षीय गर्भवती महिलेची राहत्या घरी आत्महत्या)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष दिघी येथील प्रियदर्शनी इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये दहावीच्या वर्गात शिकत होता. 10 डिसेंबरला आयुषला शाळेतून घरी आणण्यासाठी त्याची आई शाळेत गेली होती. यावेळी मुख्याध्यापक शर्मा यांनी आयुषच्या आईला बोलावून घेतलं आणि त्यांना आयुषच्या अभ्यासाबद्दल सांगितलं. या सर्वाचा आयुषला मोठा धसका बसला होता. (हेही वाचा - Mumbai Crime: तीन अल्पवयीन मुलींसह एका मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 44 वर्षीय व्यक्तीला अटक)

दरम्यान, 13 डिसेंबर रोजी घरातील कोणीही नसताना आयुषने गळफास घेत आत्महत्या केली. आयुषच्या मृत्यूला मुख्याध्यापक जबाबदार असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. भोसरी पोलिसांनी मुख्याध्यापक शर्मा यांच्यावर आयुषला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी कलम 305 नुसार गुन्हा दाखल केला आहे. अद्याप पोलिसांनी मुख्याध्यापक शर्मा यांना अटक केलेली नाही. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.