Solapur: आजपासून जिल्हा परिषदेच्या शाळांची वेळ बदलणार; 7:30 ते 11:30 दरम्यान भरणार शाळा
शाळकरी विद्यार्थ्यांना उन्हाचा तडाखा बसू नये यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळेंच्या वेळात आता बदल करण्यात आला असून सकाळच्या सत्रातच शाळा उघडणार आहे.
राज्यात सध्या उन्हाचा तडाखा हा दिवसेंदिवस वाढत आहे. या उन्हाचा त्रास शाळकरी मुलांना होऊ नये यासाठी दरवर्षी 1 मार्चपासून जिल्हा परिषदेच्या शाळेच्या वेळांमध्ये बदल हा करण्यात येतो. यावेळी सकाळच्या सत्रातच शाळा भरवली जाते आणि उन्हाचा तडाखा वाढण्यापुर्वीच शाळेतून मुले घरी जातील याची काळजी घेतली जाते. सकाळी 7:30 ते 11:30 दरम्यान शाळा या भरतील. विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात घेतली जाणार आहे. त्यानंतर 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा झाला की दुसऱ्या दिवसापासून सर्वच शाळांना उन्हाळी सुटी असणार आहे.
या संबधी आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शाळेचे वेळापत्रक बदलण्याचा निर्णय हा घेतला असून प्राथमिक शिक्षणधिकाऱ्यांनी या संदर्भातले पत्र सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पाठवले आहे. या निर्णयानुसार आता उन्हाळ्याची सुट्टी लागेपर्यंत शाळेची वेळ ही सकाळचीच असणार आहे. यावर्षी 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा झाल्यानंतर 2 मे पासून शाळेची उन्हाळ्याची सुट्टी ही सुरु होणार आहे. चिमुकल्या विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षण अधिकारी विभागाकडून देण्यात आली आहे.
गेली दोन वर्ष कोरानोमुळे राज्यातील शाळा या बंद होत्या त्यामुळे शाळकरी मुलांच्या एकुण विकासावर मोठा परिणाम झाला असून त्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी शाळांकडून अधिक प्रयत्न हे केले जाणार आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर 15 जून रोजी शाळा या सुरु केल्या जातात. पण यंदा 11 जूनपर्यंतच उन्हाळा सुटी असणार आहे. त्यानंतर 12 जूनपासून सर्व शाळा सुरु होणार आहेत.