Dr. Babasaheb Ambedkar Tourism Circuit: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य शासनाकडून खास सहलीचे नियोजन; जाणून घ्या ठिकाणांची नावे
उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत स्थळे व बुध्दिस्ट स्थळांचा समावेश असलेली राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणांचा या पर्यटन टूरमध्ये समावेश आहे.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पर्यटन सर्किटच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य, त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. या पर्यटन सर्किटची व्याप्ती वाढवून शालेय स्तरावर देखील सहलींचे आयोजन करण्याचा मानस आहे, असे उद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. चेंबूर येथील फाईन आर्ट सोसायटी मध्ये 26 नोव्हेंबर या संविधान दिनाचे औचित्य साधून ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पर्यटन टूर सर्किट’च्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत स्थळे व बुध्दिस्ट स्थळांचा समावेश असलेली राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणांचा या पर्यटन टूरमध्ये समावेश आहे. विभागनिहाय सर्किट मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद व नागपूर या जिल्ह्यात आहेत. या पर्यटन सर्कीटच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात असे पर्यटन सर्किट तयार केले आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रात पर्यटन सर्किट करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन संघर्ष आणि त्यांनी केलेले कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी हे पर्यटन सर्किट अत्यंत मोलाची भूमिका बजावेल, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.
महापुरुषांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या ठिकाणी भेट देणे, याचा एक वेगळाच अनुभव असतो. तो नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येणार आहे. यापुढे जाऊन शालेय स्तरावरील सहलीचा देखील या पर्यटन सर्किटमध्ये समावेश व्हावा यासाठी प्रयत्न करणार आहोत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील स्मारक लवकर पूर्ण करण्यासाठी हे शासन प्रयत्नशील आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत व सामाजिक न्यायाला अनुसरून आमचे शासन काम करेल, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले. (हेही वाचा: जागतिक वारसास्थळांच्या यादीतून वेरूळ-अजिंठा लेणीला वगळणार? राज्यातील पर्यटनस्थळांना मिळालेला वारसा धोक्यात)
पर्यटन विभागाद्वारे तयार करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत पर्यटन व बुध्दीस्ट स्थळांचा समावेश असलेल्या पर्यटन सर्किट पुढील प्रमाणे आहेत.
मुंबई पर्यटन सर्किट मध्ये चैत्यभूमी,राजगृह, डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन, परळची बीआयटी चाळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इकॉनॉमिक्स व कॉमर्स कॉलेज, वडाळा यांचा समावेश आहे.
कोंकण पर्यटन सर्किट मध्ये सत्याग्रह चवदार तळे, गांधारपाले किंवा पाल लेणी यांचा समावेश आहे.
पुणे पर्यटन सर्किटमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्युझियम व मेमोरीयल – सिम्बॉयोसिस कॉलेज सिम्बायोसिस सोसायटीचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान, तळेगाव, भीमा कोरेगाव विजयस्तंभ याचा समावेश आहे.
नागपूर पर्यटन सर्किटमध्ये दीक्षाभूमी, शांतीवन डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्तू संग्रहालय, नागलोक हे बौद्धतीर्थ क्षेत्र,ड्रॅगन पॅलेस, कामठी याचा समावेश आहे.
औरंगाबाद पर्यटन सर्किटमध्ये मिलिंद कॉलेज ऑफ ऑर्टस्, औरंगाबाद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांचा समावेश आहे.
नाशिक पर्यटन सर्किटमध्ये नाशिकच्या पांडव लेणी, त्रिरश्मी बौद्ध लेणी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक, काळाराम मंदिर यांचा समावेश आहे.
(The above story first appeared on LatestLY on Nov 26, 2022 11:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

