Dombivli Gang Rape Case: डोंबिवली सामुहिक बलात्काराचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवणार- एकनाथ शिंदे

या प्रकरणातील कोणत्याही आरोपीची गय केली जाणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.

Eknath Shinde | (Photo Credits: Facebook)

डोंबिवली सामुहिक बलात्काराचा (Dombivli Gang Rape Case) खटला फास्ट ट्रॅक (Fast Track) वर चालवण्यात येणार असल्याची माहिती ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली आहे. या प्रकरणातील कोणत्याही आरोपीची गय केली जाणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले. ठाण्यातील रस्ते दुरुस्ती कामाची पाहणी करताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. (Dombivli Gang Rape Case: आरोपींमध्ये राजकीय नेत्यांच्या मुलांची नावे)

पुढे ते म्हणाले की, "ही घटना अतिशय निंदनीय असून या घटनेतील 33 आरोपींची नावे समोर आली आहेत. त्यापैकी 27 जणांना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यांच्यातील कोणताही आरोपी कितीही मोठा असला किंवा राजकीय पदाधिकाऱ्यांचा नातेवाईक असला तरी त्याची गय केली जाणार नाही." (Dombivli Gang Rape Case: डोंबिवली येथे अल्पवयीन मुलीवर 29 जणांकडून सामूहिक बलात्कार)

दरम्यान, आरोपींवर कडक कारवाईचे आदेश पोलिस आयुक्त जयजित सिंग यांनी दिले आहेत. तसंच अशी कारवाई करा की ज्यामुळे अशा घटना पुन्हा होणार नाहीत आणि कायद्याची जरब राहील, अशा सूचनाही त्यांनी पोलिसांना दिल्या आहेत.

डोंबिवली मधील सामूहिक बलात्काराची ही घटना काल समोर आली. 33 आरोपींपैकी 28 जणांना अटक करण्यात आली असून 2 अल्पवयीन आरोपींची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथकाची नेमणूक केली आहे. दरम्यान, या प्रकरणामधील पीडितेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली असून पुन्हा एकदा मुली, महिला यांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.