Dombivali: डोंबिवली येथे धारदार शस्त्राचा धाक दाखवून महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न; आरोपी अटकेत
विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
धारदार शस्त्राचा धाक दाखवून एका महिलेवर अतिप्रसंग कराण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. हा धक्कादायक प्रकार डोंबिवली (Dombivali) पश्चिमेतील कोपर (Kopar) परिसरात घडला आहे. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याची या परिसरात मोठी दहशत आहे. परंतु, संबंधित महिला आरोपीला घाबरली नसून तिने त्याच्याविरोधात विष्णुनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.
महेश वाघ असे या आरोपीचे नाव आहे. महेश हा शुक्रवारी 18 रोजी संध्याकाळी 5 च्या सुमारास एका महिलेला एकटे पाहून तिच्या घरात घसला होता. त्यावेळी संबंधित महिलेने जोरजोरात आरडाओरडा केला. या महिलेचा आवज ऐकून शेजारी राहणारे अनेक लोक तिच्या घरासमोर जमा झाले. परंतु, त्याठिकाणी महेशला पाहून सर्वजण तिथून पळून गेले. मात्र, ती महिला घाबरली नाही. तिने विष्णुनगर पोलीस ठाण्यात जाऊन महेशच्या विरोधात तक्रार दिली. अखेर पोलिसांनी आरोपी महेश बेड्या ठोकल्या आहेत. हे देखील वाचा- Satara: अंडी उधार न दिल्याच्या रागातूनच दुकानदाराची धारदार शस्त्राने वार करुन हत्या; 2 आरोपी ताब्यात
या घटनेतील आरोपी महेश हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने धारधार शस्त्र दाखवत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्याने महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेने यासंबंधी तक्रार केल्यानंतर अरोपीला अटक करण्यात आली. त्याच्यावर याआधीही चार गुन्ह्यांची नोंद आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वडणे यांनी दिली आहे.