Radhakrishna Damani Buy Property in Mumbai: DMart चे राधाकृष्ण दमानी यांनी मुंबईच्या मलबार हिल्समध्ये तब्बल 1,001 कोटींमध्ये खरेदी केला दुमजली बंगला
दमानी यांच्या कार्यालयाने या घरासाठी मुद्रांक शुल्क म्हणून 30 कोटी रुपये दिले आहेत. गेल्या दोन महिन्यांत दमानी कुटुंबाने खरेदी केलेली ही तिसरी मोठी संपत्ती आहे
अब्जाधीश व्यावसायिक आणि डीमार्टचे (DMart) संस्थापक राधाकृष्ण दमानी (Radhakrishna Damani) यांनी दक्षिण मुंबईतील पॉश एरिया असलेल्या मलबार हिल्समध्ये एक लक्झरी बंगला विकत घेतला आहे. वृत्तानुसार, दमानी यांनी त्यांचा धाकटा भाऊ गोपीकिशन दमानी यांच्यासह हा बंगला विकत घेतला आहे. महत्वाचे म्हणजे हा बंगला तब्बल 1001 कोटी रुपयांमध्ये खरेदी केला गेला आहे. इकॉनॉमिक्स टाईम्सच्या वृत्तानुसार, 'मधुकुंज', नारायण दाभोळकर मार्गावरील हा दोन मजली बंगला, दीड एकरपेक्षा जास्त क्षेत्रामध्ये पसरलेला आहे. त्याचा एकूण बिल्ट अप एरिया सुमारे 60 हजार चौरस फूट आहे.
रेडी रेकनरच्या आधारावर या बंगल्याची बाजारभाव किंमत 724 कोटी रुपये आहे. दमानी यांच्या कार्यालयाने या घरासाठी मुद्रांक शुल्क म्हणून 30 कोटी रुपये दिले आहेत. गेल्या दोन महिन्यांत दमानी कुटुंबाने खरेदी केलेली ही तिसरी मोठी संपत्ती आहे. रिपोर्ट्सनुसार नुकतीच दमानीच्या फॅमिली ऑफिसने ठाण्यात मोंडलीज इंडियाकडून 250 कोटी रुपयांमध्ये 8 एकर जमीन खरेदी केली आहे. त्याशिवाय चेंबूरमधील वाधवा समूहाचा प्रोजेक्ट द एपिसेंटरमध्ये डीमार्टने 39,000 चौरस फूट क्षेत्रातील दोन मजले 113 कोटी रुपयांना खरेदी केले आहेत.
2015 मध्ये कुमार मंगलम बिर्ला यांनी 425 कोटी रुपयात 30,000 हजार चौरस फूट घर विकत घेतले. यावेळी त्यांनी 2012 मध्ये माहेश्वरीच्या 400 कोटींमध्ये खरेदी केलेल्या घराचा विक्रम मोडला होता. त्यानंतर सायरस पूनावाला यांनी ब्रीच कँडी मधील अमेरिकन वाणिज्य दूतावास लिंकन हाऊससाठी 750 कोटींची बोली लावली होती.
दरम्यान, राधाकिशन दमानी हे रिटेल बिझनेसचे किंग मानले जातात. त्यांनी 1980 च्या दशकात शेअर बाजारात गुंतवणूकदार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. 2017 मध्ये त्यांची कंपनी डीमार्टचा आयपीओ आला. त्यानंतर 24 तासांत त्यांच्या मालमत्तेमध्ये 100 टक्क्यांनी वाढ झाली. दमानी 20 मार्च 2017 पर्यंत फक्त एका किरकोळ कंपनीचे मालक होते.