Diwali 2020: आरोग्याच्या जबाबदारीचे भान ठेऊन द्या दीपावली शुभेच्छा, त्यासाठी केवळ सोशल मीडियाचा वापर करा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

महाराष्ट्र यामध्ये सर्वाधिक प्रभावित राज्य आहे. लॉक डाऊन मध्ये शिथिलता दिल्यानंतर अनेक ठिकाणी सामान्य जीवन पूर्णतः सुरळीत सुरु झाले आहे. सध्याच्या सणाच्या दिवसांत लोक खरेदीसाठी बाहेर पडत आहेत.

CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

सध्या भारतासमोर कोरोना विषाणूचे (Coronavirus) फार मोठे आव्हान आहे. महाराष्ट्र यामध्ये सर्वाधिक प्रभावित राज्य आहे. लॉक डाऊन मध्ये शिथिलता दिल्यानंतर अनेक ठिकाणी सामान्य जीवन पूर्णतः सुरळीत सुरु झाले आहे. सध्याच्या दिवाळी सणाच्या (Diwali 2020) दिवसांत लोक खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. अशात विषाणूचा संसर्ग पुन्हा वाढण्याचा धोका निर्माण होत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी जनतेला आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दीपावलीच्या शुभेच्छा देताना सणाचा आनंद जरूर घ्या पण आरोग्याच्या जबाबदारीचे भान ठेवा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

यासोबतच, आपण स्वत:देखील केवळ सोशल मीडिया, ईमेलद्वारे शुभेच्छा स्वीकारणार असून भेटीगाठी न करता अतिशय सुरक्षितपणे, घरच्याघरी हा सण साजरा करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री आपल्या आवाहनात म्हणतात, कोरोनाला सणवार -दिवाळी कळत नाही. लस जेव्हा येईल आणि आपल्यापर्यंत पोहोचेल तोपर्यंत स्वत:ला सुरक्षित ठेवणे आणि घरातले-बाहेरचे यांनाही संसर्ग होऊ न देणे हे आपले प्राधान्य असले पाहिजे. गेल्या सात आठ महिन्यात आपण सर्वधर्मीयांचे सण, उत्सव अतिशय सावधपणे आणि नियमांचे पालन करून साजरे केले आहेत. आपण जो संयम पाळला आहे त्याचाच परिणाम म्हणून आपण या महामारीला इतक्या महिन्यानंतरही रोखून धरण्यात यशस्वी झालो आहोत, हे विसरू नका.

दिवाळीच्या काळात लोक एकमेकांच्या घरी भेटी देतात, मित्रमंडळींना भेटतात. अशावेळी हे टाळून एकमेकांना शुभेच्छा देणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. एकीकडे दिवाळीचा आनंद आपण घेणार असलो, तरी दुसरीकडे हजारो डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस हे सणवार विसरून कोरोनाशी लढताहेत, तुमचा -आपला सर्वांचा जीव कसा सुरक्षित ठेवायचा ते पाहताहेत हे कृपया विसरू नका एवढीच विनंती. (हेही वाचा: शालेय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना Mumabi Local ने प्रवास करण्याची परवानगी; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय)

आपल्याला दिवाळीनंतर शाळा, महाविद्यालये सुरु करायचे आहेत. पूर्ववत आयुष्य जगायचे आहे. त्यामुळे या दिवाळीतही मास्क घालणे- हात धुणे- अंतर पाळणे ही त्रिसूत्री पाळा आणि आता हिवाळा असल्याने श्वसन रोगाला आमंत्रण देऊ नका, आपले आई वडील, ज्येष्ठ मंडळी घरात आहेत याची जाणीव ठेवा. फटाके वाजविणे आणि बाहेरच्या भेटीगाठी यापेक्षा घरातच कुटुंब एकत्रितरीत्या हा सण साजरा करा, असेही ते म्हणाले.