नरक चतुर्दशी : राज ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांवर व्यंगचित्रातून टीका
अमित शहा रूपी नरकासुराला चिरडण्याचे भाजपा कार्यकत्याला पडलेलं स्वप्न दाखवण्यात आलं आहे तर दुसर्यामध्ये देवेंद्र फडणवीसांवर टीकात्मक व्यंगचित्र काढण्यात आलं आहे.
दिवाळी निमित्त सुरू असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या व्यंगचित्राच्या मालिकेत आज दिवाळीच्या पहिल्या आंघोळीच्या धर्तीवर राज ठाकरेंनी दोन व्यंगचित्र प्रसिद्ध केली आहेत. एकामध्ये अमित शहा रूपी नरकासुराला चिरडण्याचे भाजपा कार्यकत्याला पडलेलं स्वप्न दाखवण्यात आलं आहे तर दुसर्यामध्ये देवेंद्र फडणवीसांवर टीकात्मक व्यंगचित्र काढण्यात आलं आहे. कृष्णाने नरकासूराचा वध केल्याने नरक चतुर्दशी दिवशी अभ्यंग स्नानानंतर कारेटी ही फळ पायाच्या अंगठ्याने फोडण्याची प्रथा आहे.
दिवाळीच्या निमित्त सलग पाच दिवस राज ठाकरे प्रत्येक दिवशी सणानुसार एक व्यंगचित्र सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत आहेत. दिवाळीच्या पूर्वसंध्येला त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देत पुढील पाच दिवस व्यंगचित्रांच्या मालिकेसाठी सज्ज रहा असा संदेशही शेअर केला होता.
नरक चतुर्दशी दिवशी अमित शहा यांना नरकासूराची उपमा देत भाजपा पक्ष झोपला आहे असे त्यांनी चित्रात दाखवले आहे. लोकसभा आणि महाराष्ट्रात पुढील वर्षभरात निवडणूका येऊन ठेपल्या आहेत. या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी कंबर कसायला सुरूवात केली आहे. भाजप पक्षावर राज ठाकरेंची ही व्यंगचित्रांच्या माध्यमातून होणारी टीका भाजपा कशी घेते? त्याला काय प्रत्युत्तर देते हे पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे. पहा राज ठाकरेंचं धनत्रयोदशी विशेष व्यंगचित्र