मुंबई: 15 मजली इमारतीवरुन उडी मारून हिरे व्यापाऱ्याची आत्महत्या
धीरेन शाह (वय, 61 वर्ष) असं या व्यापाऱ्याचं नाव आहे. शाह यांनी दक्षिण मुंबईतील 'प्रसाद चेंबर्स' या व्यावसायिक इमारतीच्या टेरेसवरून उडी घेऊन आपलं जीवन संपवलं आहे.
मुंबईमधील (Mumbai) 15 मजली इमारतीवरून उडी मारून एका हिरे व्यापाऱ्याने आत्महत्या (Diamond Merchant Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धीरेन शाह (वय, 61 वर्ष) असं या व्यापाऱ्याचं नाव आहे. शाह यांनी दक्षिण मुंबईतील 'प्रसाद चेंबर्स' या व्यावसायिक इमारतीच्या टेरेसवरून उडी घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. विशेष म्हणजे शाह यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करत आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे प्रसाद चेंबर्स इमारतीमधील इतर व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. यासंदर्भात मुंबई मिरर या इंग्रजी वेबसाईटने वृत्त प्रकाशित केले आहे. दरम्यान, इमारतीवरुन खाली पडल्यानंतर धीरेन शाह यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताचं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी शाह यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी या घटनेची अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. (हेही वाचा - Dombivali Fire: डोंबिवलीत एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल)
धीरेन शाह यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईज नोटही लिहून ठेवली आहे. या सुसाईड नोटमध्ये शाह यांनी ‘आत्महत्येसारखं अत्यंत टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय सर्वस्वी माझा आहे. त्यामुळे कोणालाही दोषी ठरवू नये,’ असं म्हटलं आहे. धीरेन शाह हे मुंबईतील 'डायमंड पॉलिशिंग आणि एक्सपोर्ट' कंपनीचे मालक आहेत. दक्षिण मुंबईमधील प्रसाद चेंबर्समध्ये शाह यांचे कार्यालय आहे.
आज सकाळी धीरेन शाह नेहमीप्रमाणे सकाळी आपल्या कार्यालयात आले होते. त्यांनी सकाळी 9 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास आपल्या सहकाऱ्यांना आपण इमारतीच्या टेरेसवर फेरफटका मारण्यासाठी जात असल्याचं सांगितलं होतं. परंतु, त्यानंतर काही वेळातचं त्यांनी टेरेसवरून उडी घेतली. धीरेन शाह हे मुंबईतील नेपियनसी रोडवर आपल्या कुटुंबियासोबत राहतात. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.